Bookstruck

तीन मुले 162

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘आजी, तू एकटी किती सेवा करणार?’
‘वेळ आली तर तुम्हाला बोलावीन.’
‘बोलाव हो आजी. नाहीतर संकोच करशील.’

आणि वेळ आली. रात्री मुले व बुधा गच्चीत बसली होती. मधुरी खाली एकटीच रडत होती. इतक्यात म्हातारीचा ‘निघून या’ असा निरोप आला.

‘बुधा!’ मधुरीने हाक मारली.
‘आलो ग मधुरी.’ त्याने वरून सांगितले.
तो आला आणि तिने त्याला सारी हकीकत सांगितली. त्याच्या खांद्यावर मान ठेवून ती ढसाढस रडली.

‘मधुरी!’
‘काय?’
‘नको रडू. आपण का मुद्दाम फसवले! देव दोष देणार नाही.’
‘माझ्या मंगानेही नाही दिला. तो आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. त्यासाठी हे बोलावणे आहे. चला.’

मधुरी व बुधा सर्व मुलांना घेऊन निघाली.
‘आई, कुठे जायचे?’
‘बंदरावरच्या आजीकडे.’

‘आज का नावेत बसून जायचे सर्वांनी?’
‘नाही. बोलू नका’.
आणि सारी त्या झोपडीत आली. म्हातारीने दिवा मोठा केला. सर्व मंडळी बसली.
‘बुधा, मित्रा ये. तुझ्यावर माझा राग नाही. वर्षानुवर्षे तू संयम पाळलास. थोर आहेस. माझा मत्सर केला नाहीस. माझ्यासाठी प्रार्थना करीत असस.’

‘तुझ्या डोक्यावर माझा हात ठेवू दे. आनंदात रहा. माझी मधुरी तुझी आहे. आपण जणू एक आहोत. ये.’
आणि बुधा मंगाजवळ गेला. त्याने डोके वाकविले. मंगाने त्याच्या डोक्यावर हात फिरविला. बुधाला गहिवर आवरेना. तो उठून बाहेर गेला.

‘ये, सोन्या ये. ओळखलेस का मला! मी तुझा जुना बाबा नाही का?’
‘ये, राजा ये. ये रुपल्या, तूही ये. मन्ये, तूही ये. या बाळांना, भेटा.’

‘परवा तुम्ही आले होतेत. त्या दिवशीचे तुम्हीच ना?’
‘होय हो.’
‘तुमच्या डोळयांतून त्या दिवशी पाणी आले होते. खरे ना?’
‘होय. या मजजवळ बसा. आनंदाने रहा. मोठे व्हा. कीर्ती मिळवा, नाव कमवा. सर्वांच्या उपयोगी पडा. प्रेमळ व पराक्रमी व्हा.’

‘बाबा!’
‘काय बाळांनो?’
‘काही नाही.’
‘मधुरी, वेणू व मोतीला घेऊन ये.’

« PreviousChapter ListNext »