Bookstruck

क्रांती 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''क्रांतीसाठी वातावरण तयार केलं पाहिजे. तुम्ही सुखाचे संसार सोडून गरिबांत जा. शिकून हमाल व्हा, मजूर व्हा. सुशिक्षित मुलींनी शेतकर्‍यांच्या मुलांजवळ लग्नं लावावीत, शेतात कामं करावीत, डोक्यावर भारे घ्यावेत. शेतातील गवत काढता काढता समाजातील विषमता दूर करण्याचे विचार त्यांना द्या, कामे करता करता क्रांतीची नवीन गाणी, क्रांतीचे नवीन अभंग, क्रांतीचे नवीन वेद पसरवा-दशदिशांत.

''रशिया, रशिया जप करू नका. चीन, चीन तोंडाने पुटपुटू नका. रशियातील सुशिक्षित तरुणींनी अडाणी कामगारांशी लग्नं लावली. त्यांना त्यांनी शिकवलं, सारी घरची कामं करून प्रेमानं, सेवाभावानं शिकविलं. तिकडील तरुणीही इतक्या तयार; मग तरुण किती असतील? नुसती पोपटपंची नको. सेवेनं, श्रमानं गरिबांशी एकरूप होऊन त्यांचा आत्मा जागा करा. मी हेच काम करणार. पुढे मला येऊन मिळा. आणख काय सांगू? सध्या निदान खादी वापरण्याचं तरी व्रत घ्या.''

मुकुंदराव सांगत होते. मुले शब्दन् शब्द पीत होती. शेवटी ते सद्गदित होऊन म्हणाले, ''माझं वाईट सारं विसरून जा. निर्दोष कोण आहे? मी तुम्हाला बोललो असेन. कोणाला रडविलं असेल, कोणाचा उपहास केला असेल. ललित, तुला मी त्या दिवशी बोललो. राग नको मानू, माझ्या लहान भावाला नसतं का मी सांगितलं?'' ललितच्या डोळयांतून पाणी आले. मुलेही गहिवरली.

''ललित, उगी आपण अंतःकरणात सद्भाव ठेवून एकमेकांचा निरोप घेऊ या. एक वाक्य लक्षात ठेवा. जगात अनंत दुःखं आधीच आहेत ती दूर न करता आली तर निदान त्यात भर घालू नका. तुमच्या संगतीत माझा ब्रह्मानंद होता. तुम्ही जणू माझे बाळराजे, बालदेव. तुमची आज ही शेवटची पूजा-ही शेवटची फुलं.''

घंटा झाली, मुकुंदराव निघून गेले. सर्व शिक्षकांचा त्यांनी निरोप घेतला. शाळेतील कारकून, ग्रंथालयाचे चिटणीस, सर्वांना भेटले. शाळेच्या शिपायासही त्यांनी नमस्कार केला. मैदानावर मुलांशी शेवटचे खेळले व मुकुंदराव घरी गेले.

« PreviousChapter ListNext »