Bookstruck

क्रांती 29

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''चला, उद्या येऊ. दयाराम कोठून तरी आणील पैसे. देव त्याला देईल.'' जानकी म्हणाली.

बाया उठल्या. सुताच्या गाठल्या घेऊन गेल्या. आश्रमात सारेच खिन्न बसले होते.

''आश्रमच बंद करू या. लोकांची खोटी आशा वाढवण्यात काय अर्थ?'' पार्थ म्हणाला.

''मुकुंदरावही गेले. ते आपला पगार पाठवून देत. त्यांचा आधार होता. मुलंही थोडी अधिक खादी घेत; परंतु देवानं त्यांना हाकललं.'' चुडामण म्हणाला.

''कसला देव नि काय. सारं झूट आहे. देव म्हणजे भ्रांत कल्पना आहे. आपल्या दुबळेपणातून देव जन्मतो. चिखलातून कमळ जन्मतं.'' हिरालाल म्हणाला.

''परंतु ते केवळ खोटं का असतं? त्याचा सुगंध व मकरंद का अनुभवता येत नाही? देव ही भ्रान्त कल्पना असती तर एकनाथांना अपार शांती का त्या भ्रमातून मिळाली? भ्रमातून असा अमर आनंद प्राप्त होणार असेल तर तो भ्रमच सत्यरूप आहे. बाकी इतर विचार भ्रमरूप होत.'' दयाराम म्हणाला.

''कर तुझ्या देवाची आळवणी !'' हिरा उपहासाने म्हणाला.

''मी आळवणी करीन. माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही म्हणून मी लगेच देवाला फैलावर नाही घेणार. आई मुलांचं कधी कधी मान्य करीत नाही. म्हणून का आईला आपण शिव्या देऊ? आईला अधिक कळतं. अधिक दूरचं दिसतं. कोणत्याही परिस्थितीत ईश्वरावर भरंवसा असणं म्हणेजच श्रध्दा. मारणारा त्याचाच हात, तारणारा त्याचाच. आईच्या डोळयांतील रागाच्या पाठीमागं वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.'' दयाराम म्हणाला.

''चला आपण कातीत बसू.'' पार्थ म्हणाला.

सारे मित्र आज कातीतच बसले. जणू ओंकाराचे भजनच तेथे चालले होते. गुंगुगुंगू सुरू होते.

''इतक्यात कोण आलं इथे?'' रामदास म्हणाला.

''रामदास इकडे कोठे?'' दयाराम मिठी मारून म्हणाला.

''तू म्हणाला होतास ना? 'श्रीमंत झालास, दरिद्री नारायणाला विसरू नकोस.' म्हणून आलो. दिवाळीच्या सणाच्या वेळेस खेडयातील दरिद्री नारायणाचं नाही स्मरण करावयाचं तर कधी?'' रामदास म्हणाला.

''ये. बस. आमच्याबरोबर कात.'' हिरा म्हणाला.

रामदासही चरख्यावर बसून कातू लागला.

सायंकाळ झाली. पार्थ स्वयंपाक करू लागला. रामदास इतर मित्रांबरोबर गावात हिंडायला गेला. रामदास आता श्रीमंताचा पुत्र होता. सोनखेडीला त्याची इस्टेट होती. लोक लवून त्याला रामराम करीत होते.

''भाऊसाहेब, आमच्याकडे या जेवायला.'' एक गृहस्थ म्हणाले.

''आश्रमातील पवित्र अन्नच आज घेऊ दे.'' रामदासने सांगितले.

आश्रमात आज कोणी भाजी आणून दिली. कोणी दूध आणून दिले. पार्थाने स्वयंपाक तयार केला.

मंडळी जेवली. प्रार्थना झाली. कोणी वाचीत बसले, कोणी बोलत बसले. परंतु दयाराम कोठे होता? दयाराम गच्चीत बसून अश्रूसिंचन करीत होता.

''दया, काय झालं?'' एकदम रामदासने येऊन विचारले.

दयाने आपले हृदय रिकामे केले.

« PreviousChapter ListNext »