Bookstruck

क्रांती 35

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''ध्येयाचा दिव्य प्रकाश !'' रामदास म्हणाला.

तिघे उठून चालू लागली. अंधारातही धबधब्याचे स्वच्छ पाणी- फेसाळ पाणी चमकत होते.

''ध्येयाचा उन्माद विलक्षण असतो. वेदात इंद्रदेव एके ठिकाणी गर्जना करतो. 'इकडचा पर्वत तिकडे फेकीन तिकडचा इकडे फेकीन.' ते वर्णन समाजात क्रांती करू पाहणार्‍यांचं, ध्येयवादी वीरांचं आहे. पर्वत त्यांना मुठीत मावणारे चेंडू वाटतात. अनंत आकाश जणू बिंदुकले वाटतं. सूर्य बचकेत धरू असं म्हणतात. ध्येयानं रंगलेल्या वीरासमोर कोण उभा राहील?'' मुकुंदराव बोलत होते.

''शांते, ठेच लागली ना? जरा जपून चल.'' रामदास म्हणाला.

''क्रांती करणार्‍याला 'जरा हळू जपून चल बाई, ग, जरा हळू' असं करून कसं भागेल? लागू देत ठेचा. दगडांना पायाचं रक्त लागून तेही लाल झेंडे हातात धरण्यासाठी नाचत उभे राहतील.''

''शांते, क्रांती म्हणजे अधीरपण नव्हे. मरणाची बेपर्वाई हवी, कष्टाची तयारी हवी. परंतु उगीच आगीत शिरणं, फुकट कष्ट भोगणं यात अर्थ नसतो; क्रांतीचेही शास्त्र आहे.'' मुकुंदराव म्हणाले.

मंडळी बोलत घरी आली. तो दयाराम तेथे आला होता.

''केव्हा आलास दयाराम?'' रामदासाने विचारले.

''आत्ताच आलो.'' तो म्हणाला.

''माझं जायचं बहुतेक ठरलं.''

''तुला निरोप द्यायलाच मी आलो आहे.''

''दयाराम, तुझ्या अडचणी कळवीत जा. प्रकृतीला जप. आपण पुढे सारं रान उठवू.''

''तू ये शिकून. ये सारं पाहून. आम्ही जमीन नांगरून ठेवतो.''

रात्री गोविंदराव, मुकुंदराव व रामदास बराच वेळ बोलत होते. शेवट गोविंदरावांची परवनागी मिळाली. रामदास शिवतरला रामराव व आई यांना भेटण्यासाठी म्हणून गेला.

''बाबा, शांतीला शिकू दे हां. गोविंदराव पैसे देतील. तुम्हाला चिंता नाही. तिच्या लग्नाची घाई करू नका.'' रामदास म्हणाला.

''पोरगी मोठी झाली. केव्हाच लगीन केलं पाहिजे होतं. दोन मुलांची आई झाली असती.'' आई म्हणाली.

''शांती क्रांतीची आई होणार आहे.'' रामदास म्हणाला.

''मला नाही समजत काय म्हणतोस ते.'' आई बोलली.

''आई, तू लिहायला शिकलीस की नाही?'' रामदासने विचारले.

« PreviousChapter ListNext »