Bookstruck

क्रांती 84

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बंगालमध्ये मरणाची मेजवानी चालली होती. मृत्यूचा खेळ रंगात आला होता. परंतु जगलेल्यांना जगवायला सेवक उभे राहिले. मायमाऊली काँग्रेस धावली. ते शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र राय, त्यांची ती वृध्द मूर्ती उभी राहिली. त्यांनी स्वयंसेवक मंडळे स्थापिली. त्यांनी अनेकांच्या सह्यांचे पत्रक काढले. बंगालभर मदत गोळा होऊ लागली. इतर प्रांतांतूनही मदत येऊ लागली. एकच हृदय सर्व हिंदुस्थानचे आहे हे अशा वेळेस समजून येते. मोठा प्रसंग असला म्हणजे मोठी दृष्टी येते. महान आनंद आणि महान संकट त्या वेळेस केवळ हिंदुस्थानचे एक हृदय होते असे नाही तर सर्व मानवजातीचे हृदय एकच आहे असा अनुभव येतो. तुर्कस्तानात भूकंप झाला तर सार्‍या जगातून तारा येतात. बिहारमध्ये भूकंप झाला तर जगाच्या हृदयाला धक्का बसतो.

महापुरात विपन्न झालेल्यांना सर्वच प्रकारची मदत पाहिजे होती. झोपडया बांधायला सामान हवे. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून कपडे हवेत. भुकेसाठी अन्न हवे. सहाय्य गोळा करणारी मंडळे ठिकठिकाणी काम करू लागली. आधारगृहे उघडण्यात आली. पैसे, धान्य व कपडे यांची जमवाजमव सुरू झाली. निरनिराळया गिरण्यांतून कापडांच्या गाठी मिळाल्या. स्वयंसेवक घरोघर जाऊन कापड गोळा करू लागले. धान्याच्या व्यापार्‍यांनी धान्य पाठविले. देणग्याही मिळू लागल्या.

महापुरातील टापूत दहा दहा मैलांवर आधारगृहे उघडली गेली. तेथून मदत मिळू लागली. धान्य, कपडे सारे एके ठिकाणी प्रथम जमविण्यात येई. तेथून पाठविले जाई. एके ठिकाणी मुख्य साठा, तेथून पुरवठा. स्वयंसेवकांची फार जरूर होती व त्याप्रमाणे ते मिळाले.

विश्वभारतीतूनही स्वयंसेवक गेले. रामदास त्या वेळेस घरी जाणार होता. मुकुंदरावांच्या किसान-मोर्चात सामील होणार होता. दयारामने त्याला मुद्दाम बोलावले होते. परंतु मायामुळे त्याचा बेत बदलावा लागला.

''महाराष्ट्रापेक्षा येथे आज महान विपत्ती आहे. समोर दुःख आहे, जवळच रडारड आहे. तेथे धावून जाण्याऐवजी लांब कोठे चाललेत? चला, बंगालची सेवा करा. पूर्वी मराठयांनी बंगालवर स्वार्‍या केल्या. मराठे आले असं कळताच माता घाबरत व मुलांना घट्ट धरून ठेवीत. मुलं झोपत नसली तर 'मराठा दास्यु येईल' झोप,' असे सांगत. ते पाप धुऊन टाकण्यासाठी चला. निर्मळ सेवेचा एक कण सारं पाप धुऊन टाकतो. स्नेहाचा एक बिंदू पसरतो व सुंदर रंग दाखवितो. एक लहानसा स्वच्छ किरण खंडोगणती अंधाराला प्रकाशमान करू शकतो. सुगंधी असं एक फूल जवळ ठेवलं तर अनंत घाणीचा विसर पडतो. खरं ना? चला तरमग प्रेममय सेवेचा बंगाली मातांना आस्वाद द्या. बंगाली मातांची मुलं तुमच्या पूर्वजांनी रडवली. तुम्ही येऊन हसवा. माझ्याबरोबर चला. मी तुम्हाला सेवा शिकवते.' असे माया म्हणाली व रामदासला नाही म्हणवेना.

« PreviousChapter ListNext »