Bookstruck

क्रांती 91

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१५. घरची तार

त्या दिवशी मकर संक्रांत होती. रामदास सर्वांना हलवा देत होता.

''तीळ घ्या, गूळ घ्या. गोड बोला.'' असे सर्वांना सांगत होता. माया अलीकडे त्याच्याजवळ बोलत नसे. एखादे वेळेस एकमेकांकडे पाहून दोघे मंद हास्य करीत परंतु फुलणारे हास्य लगेच मावळे. बाहेर येऊ पाहणारे हसू उभयता आत लपवीत, हृदयातील हास्य हृदयात गुदमरे. त्या हास्याला ओठावर येऊन हास्य करण्याची परवानगी नव्हती.

रामदासने सर्वांना तिळगूळ दिला. एकटी माया राहिली. तिला त्याने तिळगूळ दिला नाही. त्याच्या मनात मायाकडे जाण्याचे पुनःपुन्हा येई. परंतु तो शेवटी गेला नाही. आपल्या खोलीत तो दिलरुबा वाजवीत बसला. परंतु तार तुटली. संगीत बंद झाले. तार बांधण्यात रामदास दंग झाला.

''तुटली ना तार, बरं झालं.'' माया म्हणाली.

''तुला दुसर्‍याच्या दुःखात आनंदच वाटतो.'' रामदास म्हणाला.

''तुला दुसर्‍याचा अपमान करण्यातच आनंद वाटतो.'' ती म्हणाली.

''कोणाचा केला मी अपमान?'' त्याने विचारले.

''मायेचा.'' ती म्हणाली.

''मायेचा मान करणार फसतो. मायेला हाकलून दिलं पाहिजे. मायेत गुरफटता कामा नये.'' तो म्हणाला.

''हे तुमचं चित्र, हा तुमचा मी काढलेला फोटो. हे सारं घ्या, तुमचे मजजवळ काही नको.'' ती म्हणाली.

''तूच त्याला काडी लाव.'' तो म्हणाला.

''काडीसुध्दा तोच लावतो त्याचा काही संबंध असतो. प्रेम करील तोच अग्निसंहार करील.'' ती म्हणाली.

''माया, मी काय करू?'' त्याने विचारले.

''मला विसरा.'' ती म्हणाली.

''अशक्य आहे.'' त्याने उत्तर दिले.

''आजच विसरलेत. सार्‍या जगाला 'गोड बोल' सांगितले. परंतु माझ्याकडे आलात नाही. सार्‍या जगाला तिळगूळ दिलात. मला मात्र अपमानाचे, उपेक्षेचे विष.'' ती म्हणाली.

''माया, तू का निराळी आहेस? तू व मी अक्षरशः एकरूप आहोत. माये, हा घे हलवा, गोड बोल हं. असं मी स्वतःलाच म्हटलं व स्वतः खाल्ला. तुला नाही पोचला तो?'' त्याने विचारले.

« PreviousChapter ListNext »