Bookstruck

क्रांती 105

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

खपेल तो आधी खाईल
नवीन हा धर्म येईल
जाळू खोटया धर्माची घटोत्कची माया
घटोत्कची माया ॥ नाही.॥

आडाणी न राहू कोणी
सार्‍या आम्ही होऊ ज्ञानी
ज्ञान हवे जरी हवी दीन दशा जाया
दीन दशा जाया ॥ नाही.॥

कामाची दिवसा पाटी
ज्ञानाची रात्री पाटी
अधीर झालो आम्ही आता सत्ता हाती घ्याय
सत्ता हाती घ्याया ॥ नाही.॥

कडेवर मुलं घेऊ
क्रांतीत सामील होऊ
लाठी खाऊ गोळी खाऊ अर्पू आम्ही काया
अर्पू आम्ही काया ॥ नाही.॥

असे ते नवगीत म्हटले गेले. टाळयांच्या ठेक्यावर म्हटले गेले. शहरातील पांढरपेशे कवी किसानाला समजतील व किसानांना उठवतील अशी क्रांतीगीते रचतील तेव्हा रचतील; खेडयातील किसान स्त्रियांना जरूर भासली. त्यांना वेदना सुरू झाल्या. त्यातून ही सोपी, सुंदर व तेजस्वी गीतबाळे जन्माला येऊ लागली. ती क्रांतीच जन्माला येत होती.

मिरवणूक संपली. घनदाट सभा भरली. उत्कृष्ट व्यवस्था होती. एका बाजूला स्त्रिया बसल्या, एका बाजूला पुरुष बसले. क्रांती करणारे व्यवस्था ठेवावयास शिकत होते. किसान स्वयंसेवक-स्वयंसेविका यांची दले सभोवती उभी होती. सुंदर दृश्य होते.

मुकुंदरावांनी रामदासाविषयी दोन शब्द सांगितले ते म्हणाले, ''आज रामदास दीनबंधू होऊन तुमच्या सेवेस आला आहे. ज्याला क्रांतीचं कंकण हाती बांधावयाचं आहे त्यानं स्वतःचा संसार आधी पेटवावा लागतो. क्रांती स्वतःपासूनच सुरू केलेली बरी. रामदास माझा विद्यार्थी होता. त्याची ही त्यागवृत्ती पाहून मला कृतार्थता वाटत आहे. तो हिंडला फिरला आहे. अनुभव घेऊन आला आहे. तिकडे बंगालमध्ये शिकत असताना तिकडील शेतकर्‍यांचीही त्यानं सेवा केली. सेवा हीच त्याचा आनंद. तुम्ही सारे या त्यागी व तेजस्वी पुरुषाच्या मागं उभे राहा. संघटना करा. हुकूम होताच कूच करा. आज आपण सत्याग्रह थांबविला आहे. आपण प्रचंड चळवळ केली. थोडं फळ मिळालं. यंदा थोडी सूट मिळाली. अधीर नका होऊ. आजच्यानं सारं संपलं असं नका समजू. आजच्या मिळालेल्या यशानं आपण संघटीत होऊ या व शेवटच्या लढयासाठी तयार होऊ या. आज वाफ कोंडून ठेवू या. शक्तीचा संचय करू या. उद्या वेळ येताच इतकी प्रचंड वाफ सोडू. इतक्या वेगानं किसानांची गाडी सोडू की, विरोध करणारे जे समोर येतील त्यांचा निःपातच होईल.''

« PreviousChapter ListNext »