Bookstruck

क्रांती 107

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१८. शांतेचा संसार

रामदासाचे पत्र मिळाल्यापासून शांता अस्वस्थ होती. विद्या की विवाह हा तिच्यासमोर प्रश्न होता. मोहन स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेत नव्हता. प्रेमाचे माणूस, जवळ आल्याशिवाय तो काळजी घेणे शक्यही नव्हते. मोहन नसेल तर मला शिकून काय करायचे? मोहन नसेल तर कोठला आनंद? कोठला उत्साह? कोठली स्फूर्ती? शांतेच्या जीवनाचे जीवन म्हणजे मोहन होता. तिने शेवटी विद्येला रामराम करण्याचे ठरविले. ती धनगावला निघून आली.

दुपारच्या वेळी मोहन आपल्या झोपडीत वाचीत पडला होता, तो शांता तेथे आली. ती राहिली. मोहनकडे पाहत उभी राहिली.

''शांता, किती हळू पायांनी आलीस ! तू ! माझ्याकडे येताना तू धावत का नाही आलीस? एकदम येऊन मिठी का नाही मारलीस? मला मिठी मारणं म्हणजे मरणाला मिठी मारणं तुला वाटतं, हो ना? म्हणून भीत भीत आलीस? दबत-दबत आलीस? बस माझ्याजवळ.'' मोहन म्हणाला.

''तू पडून राहा. मोहन, किती रे खोल गेले डोळे तुझे ! तू स्वतःची काळजी का नाही घेत?'' तिने विचारले.

''शांता, किती तरी कामगारांचे डोळे माझ्यापेक्षा खोल गेले आहेत. त्यांच्या मुलांची तोंडं सुकून गेली आहेत. कामगारांचे भयाण संसार पाहून माझे डोळे का वर येतील? माझे डोळे का हसतील, आनंदाने नाचतील? त्यांची दुर्दशा पाहून डोळे मिटावे असं वाटतं.'' तो म्हणाला.

''परंतु अशाने का त्यांची स्थिती सुधारणार आहे? डोळे उघडे ठेवून त्यांची संघटना करू या. लढे लढवू या. त्यातूनच पुढे भले दिवस येतील. त्यासाठी जगलं पाहिजे. प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. मोहन, मी आता सांगेन तसं तू ऐकलं पाहिजेस.'' ती म्हणाली.,

''पुन्हा शिकायला नाही जाणार?'' त्याने विचारले.

''नाही, माझं शिक्षण पुरं झालं. आता त्या शिक्षणाचा पहिला प्रयोग तुझ्यावर महिना दोन महिन्यांत तुझं वजन वाढलं पाहिजे.'' ती म्हणाली.

''तुझ्या हातचं जेवण मिळेल तर दोन दिवसांत वाढेल वजन. तुझं दर्शन होत जाईल तर भराभर वाढेल वजन. शांते, मी केव्हाच मेलो असतो. परंतु कसा जगलो माहीत आहे?'' त्याने विचारले.

''कसा बरं?'' त्याने विचारले.

त्याने शांतेचा फोटो उशाशी होता, तो बाहेर काढला.

''या फोटोनं मला वाचविलं. मी तो उशाशी ठेवतो, हृदयाशी धरतो.'' तो म्हणाला.

« PreviousChapter ListNext »