Bookstruck

क्रांती 111

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कामगार बायका शांतेजवळ आपल्या तक्रारी मोकळेपणाने सांगू लागल्या. इतके दिवस त्या जरा दूर असत. परंतु आपल्या जातीचे माणूस भेटले, त्यांना आनंद झाला. स्त्रियांना कसकसे कारखान्यात त्रास होतात ते शांतेला कळू लागले.

मोहनला भरपूर विश्रांती मिळू लागली. त्याच्या तोंडावर तेज आले. डोळे प्रसन्न दिसू लागले. शिवतरच्या शेतात जसा तो दिसे तसा तो आता पुन्हा दिसू लागला.

''तुमचा लग्नापूर्वीचा फोटो असता व आज घेतला असता तर जमीनअस्मानाचं अंतर दिसलं असतं.'' शांता म्हणाली.

''तू मला पुन्हा 'तुम्ही' म्हटलंस.'' मोहनने म्हटले.

''बाहेर तसं बोलावं लागतं. तुम्ही म्हटलं म्हणून प्रेम का कमी होतं?'' शांतेने विचारले.

''लग्न म्हणजे जादू. लग्न करा नि लठ्ठ व्हा असं आता मी सांगत सुटेन.'' मोहन म्हणाला.

''तो कोण बरं नवीन इसम आला आहे? मी येथे युनियनमध्ये काम करीन, किसानात काम करीन म्हणतो. दिसतो गोड. बोलतो गोड. एक खिन्नता व उदासिनता त्याच्या चर्येत आहे. परंतु आपल्या मधुर हसण्यानं तो ती लपवीत असतो.'' शांता म्हणाली.

''त्याचं लग्न नसेल झालं. त्याचं लग्न दे लावून कोणाजवळ.'' मोहन म्हणाला.

''त्याला आपल्या कामात गुंतवावं. रात्रीच्या शिक्षणाचे आणखी वर्ग काढायला हवे आहेत. तो चालवील एखादा वर्ग. विचारीन त्याला.'' शांता म्हणाली.

इतक्यात ते नवखे गृहस्थ तेथे आले.

''या बसा.'' शांता म्हणाली.

''तुमच्या या चिमुकल्या खोलीतील अनंत आनंदाचा संसार पाहिला की एक प्रकारचा गोड हेवा वाटतो.'' तो तरुण म्हणाला.

''तुमचं नाव काय?'' मोहनने विचारले.

''माझं नाव? कोणतं सांगू माझं नाव? जेथे जाईन तेथे लोक नाना नावांनी मला हाक मारतात.'' तो हसून म्हणाला.

''तुम्ही नेहमी हिंडत असता वाटतं?'' शांतेने विचारले.

''हो, मला नित्य नवीन आवडतं.'' तो म्हणाला.

''मग येथे काम कसं कराल? आज कराल नि उद्या जाल ! झाड जर रोज उपटून दुसरीकडे लावू तर ते वाढणार कसं, दुसर्‍यांना छाया देणार कसं, फुला फळांनी शोभणार कसं?'' मोहनने विचारले.

« PreviousChapter ListNext »