Bookstruck

क्रांती 115

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१९. माया

माया रामदासाची वाट पाहत होती. उन्हाळयाची सुटी झाली. माया घरी गेली. वसंत ऋतू बहरला होता. कोकिळेला कंठ फुटला होता. परंतु माया मुकी होती. ती चरख्यावर कातीत बसे.

''माया, तुला काय होतं?'' आई विचारी.

''माया, तू आजारी का आहेस?'' पिता विचारी.

''सारं तुम्हाला माहीत असून का मला विचारता? माझा आनंद महाराष्ट्रात गेला आहे. माझं संगीत तिकडे गेलं आहे. तो आनंद मला द्या. ते संगीत मला द्या.'' ती म्हणे.

एके दिवशी अक्षयकुमार मायकेडे आले होते. माया आपल्या खोलीत बसली होती. तिने आपल्या हृदयदेवाचे किती तरी फोटो तेथे मांडले होते. क्षणात तो उचली, क्षणात हा उचली. क्षणात तो हृदयाशी धरी, क्षणात दुसरा पदरात लपवी. त्या फोटोजवळ ती खेळत होती, हसत होती, बोलत होती. परंतु विश्वभारतीत झाडाखाली काढलेले ते पहिले चित्र, त्याची सर कोणाला येणार? कॅमेर्‍याचे फोटो म्हणजे निर्जीव फोटो. शेवटी स्वतःच्या हाताने काढलेले ते चित्र-ते ती हृदयाशी धरी व त्यावर आपले डोके वाकवी.

दारावर कोणीतरी टिचकी मारली. मायेनं निःशंकपणे दार उघडले. अक्षयकुमार आत आले. मायेने दार लोटून घेतले.

''बसा ना अक्षयबाबू.'' ती म्हणाली.

''तू का हे सारे फोटो काढलेस?? चांगले काढलेस की ! आणि हे हाताचे आहे चित्र, सुंदर आलं आहे.'' ते म्हणाले.

''तुम्हाला या फोटोतील कोणता फोटो आवडतो?'' तिने विचारले.

''हा डोळा मिटलेला. समाधी लागलेला.'' ते म्हणाले.

''मला नाही डोळे मिटलेला आवडत. डोळे का म्हणून मिटायचे? मला हा हसर्‍या डोळयांचा आवडतो. किती गोड आहे नाही?'' तिने विचारले.

''सारे एकाचेच फोटो आहेत हे?'' ते म्हणाले.

''अजून मी दुसरे कोणाचेच काढायला शिकले नाही. सारी हृदयाची कला या एकावरच मी ओतीत आहे.'' माया म्हणाली.

''माये, प्रद्योतवर तुझं खरंच नाही का प्रेम? तो तर तुझा ध्यास घेऊन बसला आहे. काय सांगू त्याला, कसं समजावू तरी? तू का तिकडे लांब महाराष्ट्रात जाणार?'' त्यांनी विचारले.

''प्रेम बरोबर असलं म्हणजे सर्वत्र आनंदच आहे. प्रेमाला जवळ ना लांब.'' ती म्हणाली.

''पतीचं प्रेम कितीही मिळालं तरी माहेरच्या प्रेमाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. तू इतकी दूर गेलीस तर माहेरी कधी येणार? महाराष्ट्रात मग रडशील, 'उगीच इतकी लांब आले,' असं वाटेल. अक्षयकुमार म्हणाले.


« PreviousChapter ListNext »