Bookstruck

क्रांती 118

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''माया, त्यांना इकडे बोलावण्यापेक्षा आपणच तिकडे जाऊ. प्रद्योतच्या डोळयांआड बरं. आपण आधी कोणाला कळवूही नये. एके दिवशी निघावं व जावं. त्यांच्या त्या आश्रमातच तुझा विवाह करू. चालले का?'' रमेशबाबूंनी विचारले.

''बाबा, तुम्ही सांगाल ते योग्यच असेल. कोठे तरी आमचे हात हाती द्या व आशीर्वाद द्या. आमची गाडी रुळावर सोडा. आमची सहयात्रा सुरू होऊ दे. आता एकटयानं प्रवास करवत नाही. हातात हात असला म्हणजे धीर येईल. पुढे प्रवास करण्यास हिंमत येईल. एकमेकांना आधार होईल.'' माया म्हणाली.

''तू व मी दोघेच जाऊ. म्हणजे प्रद्योतला शंका येणार नाही. खर्चही फार नको.'' वडील म्हणाले.

माया काही बोलली नाही. रमेशबाबूंनी रामदासाला पत्र लिहिले. येत असल्याचे कळविले. नक्की दिवस कळविला. मायेनेही एक पत्र लिहिले.

महामायेच्या महादेवा,

तू तिकडे दीनबंधू झालास, परंतु या सखीला विसरलास असं वाटलं. परंतु ते पत्र आलं. संयमी पत्र. त्यातून तुझे सुस्कारे ऐकू आले. तुझ्या हृदयाची धडधड ऐकू आली. आता मी येत आहे तुला भेटायला, तुला कायमची मिळायला. ही बंगाली मुलगी येत आहे. या सखीला सांभाळ. प्रेमाची भुकेली ती येत आहे. तिला भरपूर प्रेम दे. या मुलीला प्रेमसिंधूत बुडव, प्रेमाकाशात उडव. प्रेमाचं संगीत ऐकव व डोलव.

जीवाच्या जीवना, मी तुला गुलाम करणार नाही. तू उंच जावंस याच हेतूनं तुला जरा पकडीन. पतंग आकाशात उंच उडतो. तो दोरा त्याला उंच उडवण्यासाठीच असतो, पतंगाचं ते बंधन आहे का? ते बंधन उंच उड्डाणासाठीच आहे. लहानसा पतंग, परंतु त्या दोर्‍यानं तो उंच जातो, तो दोरा त्याला जरा ओढतो, जरा हिसके देतो. परंतु ते प्रेमाचे हिसके असतात. त्यामुळे दोर्‍याला शोभा. तो बारीकसा दोर. तो दृष्टी ला दिसतही नाही. दिसतो तो सुंदर पतंग, आकाशात विहरणारा रंगीत पतंग. परंतु तो बारीक धागा नसेल, चिवट धागा नसेल तर पतंग तरंगेल का? अनंत आकाशातील निर्मळ हवा खाईल का, मेघांशी कानगोष्टी करील का? घरातील पत्नी, तिचा तू सूक्ष्म प्रेममय धागा, त्याचं दर्शन दर्शन जगाला नसतं. परंतु पतीचा पतंग त्यामुळेच नीट उंच जातो, हे खरं नाही का?

हृदयदेवा, भिऊ नको. आसक्तीच्या चिखलात मी तुला डांबणार नाही. संपत्तीची मी भुकेलेली नाही. तुझ्या प्रेमाची भुकेलेली आहे. तू जाशील तेथे मी येईन. तू आगीत उडी टाकलीस तर तेथे मीही उडी घेईन. तू असशील तेथे माझा स्वर्ग, तेथे माझे परम सुख. आपण आपली जीवनाची फुलं गरिबांच्या सेवेस देऊ. त्यांची सेवा करता यावी म्हणून फुलू. किंबहुना त्यांची सेवा करीत राहिल्यानेच फुलू.

माझं चिमुकलं घर मी कधीच रंगवलं आहे. सजवलं आहे. माझ्या या हृदयमंदिरात प्रेममूर्तीची प्राणप्रतिष्ठा कधीच मी केली आहे. तेथे मी तासन्तास पूजाअर्चा करीत रमते. माझ्या या चिमुकल्या घरात गोड गोड प्रकाश भरला आहे. गोड गोड संगीत भरलेलं आहे. प्रसन्न परिमल दरवळलेला आहे. देवा, या चिमकुल्या घरातील गाभार्‍यात तुला आणून बसविलं आहे हे तुलाही नाही अद्याप माहीत?

« PreviousChapter ListNext »