Bookstruck

क्रांती 121

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुंदर मंडप घातला होता. खादीची सुंदर तोरणे लावली होती. देशभक्तांचे फोटो होते. हजारो किसान स्त्री-पुरुष जमले होते. मुलामुलींची गर्दी होती. दयारामने वधूवरांस नववस्त्रे दिली.

''हा दयाराम हो. चरख्यावर मुळी न तोडता काढलेल्या अखंड सुताची ही वस्त्रं आहेत.'' रामदास म्हणाला.

'''अखंड प्रेमबंधन राहील.'' माया म्हणाली.

मुकुंदरावांनी मंत्र म्हणून मराठीत अर्थ सांगितला. नंतर वधूवरांनी परस्परांस सुताचे हार घातले. टाळयांचा गजर झाला. सर्वांनी फुले उधळली. वधूवर वडील मंडळींच्या पाया पडली. मायेने आपले श्वश्रू-श्वशुर पाहिले. त्यांच्या पायावर तिने डोके ठेवले. त्यांनी तिला जवळ घेऊन आशीर्वाद दिले. रमेशबाबूंनी प्रेमाने थबथबलेला हात उभयतांच्या विनम्र मस्तकांवर ठेवला. वधूवरांस किती तरी किसानांनी हार घातले, किसान बायांनीही घातले.

रात्री सर्वांना साधे परंतु रुचकर जेवण देण्यात आले. माया व रामदास जवळजवळ जेवावयास बसली होती. भोजने झाली. मंडपात मंडळी बसली. रामदास दिलरुबा वाजवणार होता.

''माये, दे दिलरुबा नीट करून. तुझा कोमल हात लागताच तो नीट होईल. त्याच्यातील विरोध मावळेल.'' रामदास गोड गोड हसला.

मायेने दिलरुबा हातात घेऊन हृदयाशी धरला. हृदयातील अनंत तारांचे संगीत त्या दिलरुब्याला तिने ऐकविले व त्याला ती मनातल्या मनात म्हणाली,'' जा त्यांच्या हातात व हे दिव्य संगीत ऐकव सर्वांना.'' त्या दिलरुब्याचे तिने चुंबन घेतले.

''घ्या हा. आता सुंदर होईल काम, गोड होईल काम.'' ती म्हणाली.

''मी वाजवीन, तू काय करशील?'' त्याने विचारले.

''मला एकच गाणं येतं. ते मी म्हणेन, शेवटी म्हणेन...'' ती म्हणाली.

''कोणतं गाणं?'' त्याने विचारले.

''वंदे मातरम् !'' ती म्हणाली.
दोघांनी भारतमातेस हात जोडले.

''माये, तू कोणाची?'' त्याने विचारले.

''तुमची ! तमुची'' ती म्हणाली.

''माये, मी कोणाचा?'' याने विचारले.

''माझे, माझे !''ती म्हणाली.

''आपण दोघे कोणाची?'' तिने विचारले.

''दरिद्रीनारायणाची, भारतमातेची, देवाची.'' ती म्हणाली.

« PreviousChapter ListNext »