Bookstruck

क्रांती 133

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पावसाळा सुरू झाला होता. बंगालमध्ये तर अलोट पाऊस. इकडे पाऊस कमी. तरीही चिखल फार होई. चिखलातून जाताना एखादे वेळेस पायात काटा मोडे. तो काढताही येत नसे. इतका चिखल पायावर असे. माया चिखलाला कंटाळे परंतु शेतकरी व त्यांच्या बायका त्यातून काम करीत आहेत हे पाहून मायेला लाज वाटे. पावसाळयात फार हिंडता-फिरता येत नसे. माया सूत कातीत बसे. रामदास हळूच येऊन डोळे झाकी.

''डोळे मिटूनसुध्दा मी सूत कातते. मला सवय आहे. शांतेचे डोळे मोहन फार धरतो. तुम्ही मोहनपाशी शिकलात वाटतं हे?'' माया म्हणे.

''शिकायला कशाला हवं? एवढी साधीही गोष्ट मला करता येत नाही वाटतं?'' रामदास म्हणे.

एके दिवशी रामदास पावसातून आला. पागोळयाचे पाणी त्याने हातात आणून ते मायेवर उडवले. माया रागावली. ''हे काय काहीतरीच? वेड तर नाही ना लागलं?'' ती म्हणाली, ''तू रागावलीस म्हणजे बरं वाटतं. परंतु फार नको हो रागावू. नाहीतर स्वयंपाक मला करायला लागायचा.''तो म्हणाला. माया एकदम गंभीर झाली. तिचे लक्ष कोठेतरी दूर गेले, रामदास तिच्या चेहर्‍यावरील फरक पाहत होता.

''काय झालं माये?'' त्याने विचारले.

''मला प्रद्योतची आठवण झाली. एके दिवशी त्यानं असंच माझ्या अंगावर पाणी उडवलं होतं. मी त्याला कमळाच्या देठानं मारलं. वेडा आहे प्रद्योत. तो वेडा झाला असेल का? जागत एकाचं सुख ते दुसर्‍याचं दुःखं असं का बरं असावं? एकुलता एक मुलगा दुःखी व निराश पाहून अक्षयकुमारांची काय स्थिती होत असेल? ते प्रेमळ पितृ-हृदय, त्याची कशी कालवाकालव होत असेल? एखादे वेळेस ते सारं मनात येऊन मला दुःख होतं. मी जन्मले नसते तर बरं असं वाटतं.'' माया म्हणाली.

''माया, तू महाराष्ट्रात आलीस म्हणून तुला वाईट वाटलं का?'' रामदासने प्रश्न केला.

''काय हे विचारता? तुम्ही पुरुष की नाही निष्ठुरच. प्रद्योतची आठवण होणं हे का पाप आहे? मी माणूस नाही? भावाची आठवण नसती का मला आली? घराच्या ओसरीत, पडवीत सारी नाही का येऊन बसत? दिवाणखान्यातही नाही का येऊन बसत? घरातील काही भाग मात्र असा असतो की, जेथे दुसरा येत नाही, तेथे आलेला आपण सहन करणार नाही. तेथे फक्त तुम्ही व मी, मी व तुम्ही. तेथे आपले अद्वैत.'' माया बोलली.

रामदास जरा खिन्न व गंभीर होऊन निघून गेला. मायाही अश्रूसिंचन करीत बसली. रामदासाने हळू येऊन तिचे डोळे पुसले. ''कशाला पुसता डोळे? आधी रडवायचं व मग डोळे पुसायचे? मायेचं कोणी नाही, कोणी नाही.'' असे म्हणून तिला अधिकच हुंदका आला. तिने आपली मान रामदासाच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिला शांत केले.

पावसाने शेती पिकते. मधून-मधून अशा सरी येतात व जीवनाला माधुरी येते. एक प्रकारचा सात्त्वि रंग चढतो.

माया मराठीचा अधिक अभ्यास करू लागली. रामदास तिच्याबरोबर वाची. त्यानेही मायेबरोबर बंगालीचा अधिक परिचय करून घेणे सुरू केले. असा हा सहकार चालला होता. जीवनाची आंबराई मोहरत हाती, बहरत होती. संस्कृतमध्ये आम्रवृक्षाला नावच सहकार आहे ! किती गोड नाव ! सहकाराशिवाय शीतल छाया नाही, सुंदर मोहर नाही. रसाळ फळे नाहीत; म्हणून तर सहकारवृक्षाचे पल्लव सर्व धर्मकर्मांत पवित्र म्हणून आणले जातात. संसारात सहकार शिका असे जणू आमच्या संस्कृतिसंवर्धकास शिकवावयाचे होते.

« PreviousChapter ListNext »