Bookstruck

क्रांती 137

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''माया, रडू नको. वंगकन्येला रडणं शोभत नाही. स्वातंत्र्यप्रिय महाराष्ट्रालाही ते शोभत नाही. सार्‍या देशालाच ग्रहण लागलेलं आहे. जोपर्यंत पारतंत्र्य आहे तोपर्यंत कोठले सुखाचे संसार? तोपर्यंत सुखाचे संसार करू बघणं, सुखाच्या संसाराची इच्छा करणं म्हणजेही पाप. आपणाला हे शिकविण्यासाठी हे संकट आलं आहे. सेवा करताना सत्त्वपरीक्षा होत असते. तीत उत्तीर्ण झालं पाहिजे. माया, धीराने राहा. शांत राहा. चरखा आहेच, तुला धीर द्यायला. चरखा म्हणजे महात्माजी, चरखा म्हणजे पूज्य विनोबाजी, चरखा म्हणजे वृध्द प्रफुल्लचंद्र रॉय. हे सारं तुझ्याजवळ त्या चरख्याच्या रूपाने आधार देण्यास आहेत. दयाराम, तू आहेसच. मुकुंदराव, मोहन यांना कळलेच. शिवतरला जाऊन बाबांना व आईला तू धीर दे. माया, तू घरी सविस्तर पत्रं लिही. चिमाआप्पा वगैरे आहेतच येथे. या माय-बहिणी आहेत. उगी; रडू नको. चला फौजदारसाहेब.'' रामदास शांतपणे म्हणाला.

दयारामने येरवडाचक्र व सुंदर पेळू आणून दिले. मायेने घरातून कपडे आणून दिले. घोंगडी वगैरे सारे दिले.

''ही अंगावर असू दे हं.'' ती स्फुंदत म्हणाली.

''हो. ते संरक्षण आहे. ते सर्वस्व आहे.'' रामदास म्हणाला.

फौजदार, पोलिस रामदासला घेऊन गेले. दयाराम थोडया वेळाने आश्रमात गेला. माया शून्य दृष्टीने पाहत खिडकीशी उभी होती.

« PreviousChapter ListNext »