Bookstruck

क्रांती 156

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी जरा गडबड होणार होती. एका मिलच्या मॅनेजरची मोटार येत होती. कामगार ती दरवाजातून आत जाऊ देत ना. ''आमच्या अंगावरून न्या मोटार, भिता का? आमच्या रक्तावर तर कारखाने चालले आहेत. आणखी थोडे सांडायला का भिता? चिरडा आम्हाला. येऊ द्या मोटार पो पो करीत.'' कामगार म्हणू लागले. मोटार गेली. कामगारांनी जयघोष केला. मॅनेजर पायी मिलमध्ये जाण्यासाठी आला. त्याला शांतपणे कामगार बंधु-भगिनींनी जाऊ दिले. परंतु ती एक कामगार नागिणीप्रमाणे चवताळून आली. ती पाहा विकट हसत आली. पानपट्टी मुद्दाम खाऊन आली. एकदम मॅनेजरजवळ गेली व थू थू करून त्याच्या अंगावर तिने लाल थुंकी उडविली. ''लाल झेंडे की जय' तिने गर्जना केली. ''अब्रू घेतोस नाही आमची? थांब आणखी थुंकते.'' असे त्याचा हात धरून त्याला हलवीत ती म्हणाली. काही कामगार धावत आहे. त्यांनी त्या बाईला दूर नेले. ''मला नका ओढू. त्या मांगाला ओढा, थुंका त्याच्या तोंडावर सारे !'' ती गर्जत होती. इतक्यात पोलीस आले. कामगार-पुढारीही धावत आले. शांत झाले सारे. लाठीमार टळला.

सार्‍या गावची आर्थिक रचना ढासळली. काही बोलपटगृहे बंद पडली. कोण जाणार तेथे? कामगारच थोडी करमणूक व्हावी म्हणून तेथे जातो. विडीपानपट्टीची दुकाने बंद झाली. धान्याचे व किराणाचे व्यापारी थंडावले. आठवडयाच्या बाजाराच्या दिवशी शेकडो पोती धान्य खपायचे ते खपेनासे झाले. हॉटेले ओस पडली. सर्वत्र प्रेतकळा आल्यासारखे झाले. आठ हजार कामगारांच्या पगाराचा पैसा बाजारात दर महिना खेळत होता. तो खेळेनासा झाला. दोन-तीन लाख रुपयांचे बाजारात नेहमी येणारे भांडवल बंद झाले.

कामगार जगणार कसे? त्यांना उपवास पडू लागले. धान्य वाटले जात होते. ज्यांना अत्यंत जरूर त्यांना आधी दिले जाई. स्वयंसेवक दूध नेऊन वाटीत. ज्यांची  लहान मुले त्यांना दूध पुरविण्यात येई. कामगार पुरुष एका वेळेला जेवू लागले. एक वेळ रात्री कामगार मैदानावर डाळचुरमुरे खात व क्रांतीची गाणी गात. काही व्यापार्‍यांनी युनियनला पतीवर उधार धान्य देण्याचे कबूल केले. युनियन पोती आणी व धान्य वाटी. ज्याच्या त्याच्या नावावर ते लिहिले जाई.

तडजोडीचे पुन्हा एकदा प्रयत्न करावे असे काहींच्या मनात आले. युनियनचा चिटणीस मोहन होता. तो आजारी होता. तरी सारखे काम करीत होता. त्या दिवशी तो मालकांच्या कचेरीत जात होता. त्याने वर चिठ्ठी पाठवली होती. परंतु उत्तर नाही. तेव्हा तो जिना चढून वर जाऊ लागला. मालक, त्याचे मॅनेजर, काही डायरेक्टर तेथे जमलेले होते. मोहन एकदम जाऊन उभा राहिला.

''साला बदमाष ! येथे कसा आला? हाकला याला.'' एक मॅनेजर म्हणाला.

''मी तुम्हाला काही विचारायला आलो आहे.'' मोहन शांतपणे म्हणाला.

''भुके मरता; आता विचारायला येता. निघा येथून. वेळ नाही आम्हाला. कोण आहे रे? याला हाकला. हा कुत्ता वर कशाला येऊ दिला? न्या त्याला ओढीत तिकडे.'' तो मॅनेजर ओरडला.

नोकरांनी मोहनला ओढले व जिन्याजवळ नेले.

''वर कशाला गेलास? आम्हाला शिव्या मिळतात ना.'' असे म्हणून त्यांनी त्याला ढकलले. मोहन जिन्यावरून पडला की त्याला घेरी आली? का भावनांमुळे तो बेहोष झाला होता? तो खाली पडला खरा, ते नोकर जरा घाबरले. त्यांनी जाऊन सांगितले, 'तो जिन्यावरून खाली पडला.''
''मरू दे. येथे वेळ नाही.'' कोणी बोलले.

« PreviousChapter ListNext »