Bookstruck

क्रांती 159

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हजारो कामगार व अवलंबून असणारी मंडळी मरणाच्या दारी होती. परंतु त्या प्रसंगाने कवींच्या प्रतिभेला पाझर फुटले नाहीत. त्यांच्या वाग्ववल्लरीला पल्लव फुटले नाहीत. सारे सुशिक्षित पांढरपेशे कवीश्वर  वागीश्वर मेलेल्याप्रमाणे थंडगार राहिले. सारे साहित्यसम्राट-त्यांच्या लेखणीला याविषयी काही लिहावे असे वाटले नाही. मोठमोठी दैनिके व साप्ताहिके, भविष्ये रकाने भरून देत होती. परंतु येणारे भविष्य येथे जळजळीत उभे होते. त्याची त्यांना पर्वा नव्हती. बोलपटांची वर्णने व फोटो देणारी पत्रे या बाबतीत मूळ गिळून बसली होती.

श्रमजीवी कामगारा, तुझा तूच कवी हो व क्रांतीची गाणी गा. भूक-भूक आरोळी मारून निजलेल्यांना जागे कर. कासिम, गा 'कहा छुपा श्री, भगवान' तुझे गीत गा. छंदशास्त्रवेते येतील व तुझ्या हृदयगीताची चिरफाड करून बघतील. परंतु त्यांना त्या गीतातील अमर, अभंग आत्मा दिसणार नाही. कोणी मुस्लिम लीगवाले म्हणतील, येथे श्रीभगवान् शब्द का घातला, कोणी हिंदुमहासभेवाले येऊन म्हणतील, आमच्या श्रीभगवंताला मुसलमानाने बाटवले. कासिम, तू फिकीर करू नको. हा शब्द कोणाचा याचा क्षुद्र विचार तू नको करू. विचार गरिबांच्या मरणाविषयी बेफिकीर असणार्‍यांना करू दे. तू क्षूद्र धर्माच्या वर जाऊन मानवाच्या ऋषी व प्रेषित होऊन, उदार भावनांनी, उदात्त विचारांनी भरलेले अकृत्रिम गान कामगारांना देत आहेस. नव भविष्याच्या उद्गात्या! तुला माझे शतशः प्रणाम !तुझ्या पवित्र प्रतिमेचा अल्पशा स्पर्श जर माझ्या वाणीला होईल तर मी स्वतःला कृतार्थ मानीन.

भुकेलेले हाजारो जीव, कासीमच्या गाण्याने मंत्रमुग्ध होऊन बसले. त्यांच्या तोंडावर तेज फुलले. भुकले ली तोंडं तेजाळली. निस्तेज व खोल गेलेले डोळे चमकले. स्वतःचा वागीश्वर त्यांना मिळाला. स्वतःच्या भावना बोलून दाखविणारा निर्मळ व जिवंत शाहीर त्यांना भेटला. त्यांचा तो आनंद होता. पार्थिव आनंद नव्हता. तो अपौरुषेय आनंद होता. चिदानंद होता.

निरनिराळी भाषणे झाली. परंतु ती एक कामगार भगिनी म्हणाली, ''आमची हाडं घाला म्हणावं आता गिरणीत. स्वस्त मिळतील. पोरं-बाळं मरत आहेत. मजूर मरत आहेत. गिरणीला होईल म्हणावं जळण. कामगारांच्या प्राणांचे कोळसे घाला तुझ्या भट्टीत व निघू देत काळाकुट्ट धूर. हजारो संसारांच्या राखरांगोळाचा धूर. आमच्या प्राणांचं घाल पेट्रोल व चालव तुझी मोटार व करू दे तिला पों पों. आमच्या प्राणांचे दगड पायामध्ये बसव व बांध तुझा बंगला-भूतबंगला व चालू दे तुझं गाणं, चालू दे नाचरंग. दिवाळी येत आहे. घे आमच्या प्राणांचं उरलंसुरलं तेल व पेटव तुझे दिवे-कर तुझी दिवाळी, कर तुझं लक्ष्मीपूजन ! आमचं मरणं ते यांचं जगणं, भयाण-राक्षसांचं जगणं, आग लागो त्या जिण्याला.''

अशी भाषणे होऊ लागली. भावना भडकू लागली. शेवटी शांत करणारी मुकुंद-वेणू सुरू झाली. इतक्यातआनंदमूर्ती आले. मदत घेऊन आले. 'आनंदमूर्ती की जय, इन्किलाब झिंदाबाद' गर्जना झाली. मुकुंदरावांनी त्यांना बोलण्याची विनंती केली. आनंदमूर्तींची गोड मूर्ती उभी राहिली. सर्वांना आनंद झाला. सौंदर्य क्षणभर भुकेची विस्मृती पाडते. आनंदमूर्ती म्हणाले,''संप शेवटपर्यंत शांतपणे चालू दे. आपण मरू पण हार जाणार नाही. आपल्या मरणातून उद्याच्या कामगारांना सुखाचे स्वाभिमानी जीवन मिळेल, दिवाळी येत आहे. दिवाळीच्या दिवशी प्रत्येक कामगाराला एकेक रुपया देण्यात येईल. माझ्या मित्रानं दहा हजार रुपये मदत तुम्हाला दिली आहे. दिवाळी गोड होऊ दे.'' ते शब्द ऐकताच टाळयांचा कडकडाट झाला. उत्साह संचारला. त्या उत्साहातच सभा संपली.

असा हा ऐतिहासिक संप चालला होता, परंतु किती दिवस चालणार? त्याला काही सीमा होती की नाही?

« PreviousChapter ListNext »