Bookstruck

क्रांती 173

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

''तो अनंताचं दर्शन होत असता जन्मलेला आहे.'' माया म्हणाली.

एके दिवशी रात्री प्रार्थना झाल्यावर तेथेच अंगणात सारी बसली होती. दयाराम, रामदास, गीता, माया तेथे होती. मायेच्या मांडीवर मुलगा झोपला होता. परंतु क्रांती खेळत होती. ती आता रांगू लागली होती. स्वैरसंचार करू लागली होती. एकदम रामदास तेथून उठून गेला व गच्चीत जाऊन उभा राहिला. दूर पाहू लागला.

''काय पाहता दूर?'' मायेने खालून विचारले.

''ते पाहा, पहाड पेटले आहेत. वर या. बघा. लाल-लाल शिलगले आहेत.'' रामदास म्हणाला.

सारी मंडळी वर आली. तो भव्य भीषण देखावा बघू लागली.

''असाच भडका उडेल एक दिवस. मुकुंदराव, मोहन, शांता, मीना यांनी बी पेरलं, क्रांतीचं बी पेरलं. त्याचा महावृक्ष होईल. त्यांनी ठिणगी पेटवली, त्यातून आगडोंब उठेल, सर्वत्र अशांतता आहे. जगात युध्दाचे गडगडाट होत आहेत. प्रचंड उलथापालथी होतील. लहानगी क्रांती विश्व व्यापून उरेल.'' रामदास जणू भविष्यवाणी बोलत होता.

''सर्व देशांतून क्रांती होईल. जगातील पिळले जाणारे सारे एक होतील. जगातील श्रमजीवी जनता एक होईल. सर्व जगाचा एक झेंडा होईल. महान स्वप्न सत्यसृष्टीत येईल. सारा संसार सुखाचा होईल. जगङ्व्याळ क्रांती खरीखुरी शांती आणील.'' दयाराम म्हणाला.

''क्रांती, होशील ना तू मोठी? व्यापशील का सारं जग?'' गीतेने विचारले. लहानग्या क्रांतीने चिमुकले हात पसरले.

इन्किलाब झिंदाबाद !

« PreviousChapter List