Bookstruck

सती 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राधेगोविंद : अद्याप श्रध्दा आहे, म्हणून तर धर्म टिकला आहे. भोळेभाबडे असतात लोक. हा साधा भाबडेपणा जर का गेला, तर धर्म टिकणार नाही.

शिष्य : धर्म गेला तर गादी कशी चालेल?

राधेगोविंद : चालेल तितके दिवस चालेल. आपल्या पुण्यमय भारतवर्षात तरी धर्म मरणार नाही, गादी संकटात पडणार नाही.

शिष्य : गादीचे आहेच तसे तेज!

इतक्यात श्रीमंताची खास स्वारी मोठया कष्टाने चालत तेथे आली. श्रीमंत वासुदेवरायांनी महाराजांच्या पायांवर कसेबसे डोके ठेवले. महाराजांनी आशीर्वाद दिले.

राधेगोविंद : तुम्ही कशाला आलात? तुम्हाला नाही नीट चालवत? भेलकांडी जायची एखादी. मीच तुम्हाला भेटायला येणार होतो. तुमच्या पक्तींला मला जेवता आले नाही. कारण तुम्ही निपुत्रिक, परंतु तुम्हाला मुलगा होईल. अद्याप होईल. असे मला वाटते. देवाची लीला अगाध असते तो वठलेल्या वृक्षांनाही पुन्हा पालवी फोडतो.

वासुदेवराव : आपला आशीर्वाद असला म्हणजे सारे होईल.

राधेगोविंद : आळसाने प्रयत्न सोडू नये. पुन्हा लग्न करून रहावे. तीन वेळा लग्न करून नाही झाले मूल, कदाचित चौथीला होईल. प्रभू आपली सत्त्वपरीक्षा पहात असतो.

वासुदेवराव : अहो, आता मुलगी द्यायला लोक कचवतात.

राधेगोविंद : परंतु आता मी घेतले आहे ना मनावर! आता निश्चित रहा. मुलींना काय गेला तोटा. या आपल्या देशात पैशाने सारे काम होते. तुग्ही जरा पिशवी सैल सोडा. स्वर्गातील अप्सरा तुम्हाला आणून देईन. आधी माझा शब्दही फार भरून कोणी मोडी नाही; कारण आम्हाला धर्मरक्षणासाठी सारे करायचे असते. आम्हाला दुसरी इच्छा नाही.

वासुदेवराव : धोंडभटजी काय म्हणतात शेवटी?

राधेगोविंद : दहा हजार मागतो आहे; परंतु द्यायला हरकत नाही. मुलगी केवळ रंभा आहे म्हणतात. तुमच्या ऐश्वर्याला साजेशी आहे.

वासुदेवराय : हे पहा, त्या मुलीवर इतर श्रीमंताचेही डोळे आहेत. तिला अनेकांकडून मागण्या घातल्या जात आहेत; परंतु मीही हट्टास पेटलो आहे. वाटतील तेवढे पैसे द्यायचे; परंतु हा लिलाव जिंकायचा, असे मी ठरविले आहे. माघार हा शब्द आमच्या घराण्यात नाही. आमचे शूर पूर्वज रणांगणात धारातीर्थी पडत, नाही तर विजय तरी मिळवीत. त्यांची परंपरा का मी सोडू? या मुलीला मीच जिंकून घेणार. या अर्थकामांच्या युध्दात मीच विजयी होणार.

राधेगोविंद : अशी हिंमत धरा. बुढ्ढ्याप्रमाणे न बोलता तरुणाप्रमाणे बोला. जगात त्यागाशिवाय भोग नाही. श्रृतींचे वचनच आहे. पैशांचा त्याग करा की, भोग्य वस्तु आलीच जवळ, अहो, तुमच्यासारख्या थोरामोठयांची लग्ने जुळविणे म्हणजे मला फार पवित्र कार्य वाटते. आजपर्यंत किती जणांची दिली जुळवून.

वासुदेवराव : आपला पुण्यप्रताप थोर आहे. माझेही हे काम फत्ते होऊ दे. तिजोरी मोकळी आहे.

राधेगोविंद : मग काम झालेच समजा. 'द्रवेण सर्वे वशा;' पैसा म्हणजे शक्ती, पैसा म्हणजे परमेश्वर म्हणून भगवंतासही लक्ष्मीपती म्हटले आहे. जेथे पैसा आहे तेथे परमेश्वराचे अधिष्ठान आहे. लक्ष्मीला सोडून नारायण कसा जाईल? तुम्हाला मुलगी मिळवून देतो. आणि निश्चित असा. तुम्हाला? मुलगा झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रसादाने सारे होईल.

« PreviousChapter ListNext »