Bookstruck

रिकामे साक्षीदार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

आपण फक्त रिकामे साक्षीदार
जगात चिरकाल फक्त काळ
शेवटल्या श्वासाचे दावेदार
बाकी उर्वरीत संथ मवाळ

गर्क आयुष्यातल्या सुंदोपसंदी
अकल्पित वास्तवाच्या गाभ्यात
मखमली दूरस्वप्ने मावळती
संसारचूलीच्या निवलेल्या राखेत

पूर्वापार श्रद्धेची खंगलेली जळमटं
सणासुदीच्या उभ्या आडव्या भिंती
चौफेर आयुष्याला व्रतवैकल्याची चौकट
घुसमटीची बंदिस्त दिखाऊ बांधिलकी

मुदतीच्या जगण्यातला एकसूरी पाठ
उपजीविकेसाठी दाही दिशा फरपट
पोटाच्या भुकेला पर्याय भरमसाठ
निर्दयी नियतीचं काळाशी साटंलोटं

मृत्यूच्या फेऱ्याला दैवाची बोळवण
मातीमोल देहास किरवंताचे संस्कार
पाप-पुण्य, गतजन्माची तार्किक उधळण
अखेर उरतो एकाकी काळाचा आधार

भूषण वर्धेकर
29-10-2015
रात्रौ 10:30
हडपसर

« PreviousChapter List