Bookstruck

नाते समृद्ध होण्यासाठी...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

लेखिका - वर्षा जाधव (varsha.abhi7@gmail.com)

मुलीचं लग्न करताना मुलगा चांगला कमावता आहे ना, हे पाहिलं जातं. मुलगी स्वतः अर्थार्जन करणारी असेल तर जावई तिच्या वरचढ कमावणारा हवा, ही मुलीची व तिच्या पालकांचीही अपेक्षा असते. मुलांनाही त्यांच्यापेक्षा जास्त पगार असणारी मुलगी नको असते. कारण, ती डोक्‍यावरच बसणार ही धारणा...

अर्थात, समाजात स्थित्यंतरं घडताहेत. काळाची गरज म्हणूया; पण महिला पुरुषांप्रमाणे घराबाहेर पडून काम करताहेत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रांतही महिलांचा शिरकाव झालाय. स्त्री-पुरुषांची शारीरिक घडण व क्षमता यांतील फरक आणि निसर्गाने स्त्रीला दिलेल्या काही जबाबदाऱ्या यामुळे स्त्रियांच्या कार्यक्षेत्रात काही मर्यादा येतात. जरी हा निसर्गनिर्मित फरक दोघांत असला, तरी यापेक्षा सध्याच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा पगडा तरुण पिढीवर अधिक जाणवतो. त्यामुळे "मुलगा‘ म्हटल्यावर मला माझं कुटुंब चालवायला कमावलंच पाहिजे ही मनोवृत्ती दिसते आणि मनावर ताणही जाणवतो.  माझ्या परिचयातील एक युवक जेमतेम 19-20 वर्षांचा, अजून शिक्षण अर्धवट. त्याच्याशी त्याच्या भावी आयुष्याविषयी बोलल्यावर तरुणांची मानसिकता समोर आली. त्या तरुणाने आवेशानं सांगितलं की, शिक्षण संपल्यावर भरपूर पगार असणारी नोकरी बघणार. का, तर लग्न झाल्यावर बायकोने काही मागितलं तर ते देण्याची ऐपत असली पाहिजे. तिच्या मागण्या पूर्ण करता आल्या नाहीत, तर नवरा म्हणून माझी काय किंमत राहणार? इथं तो पारंपरिक नवऱ्याच्या भूमिकेतून बोलत होता. त्याला मिळणारी बायको स्वतः कमावती असेल व स्वतःला पाहिजे ते घेऊ शकेल असा विचार त्याच्या मनात आला नव्हता. जसा मुलाचा बालहट्ट पुरवण्यात आईला धन्यता वाटते, तसा पत्नीहट्ट पुरवणं हा पतिधर्मच मानला जातो. इथे पुरुषांना हे कर्तेपणाचं जोखड पेलणं फारसं सुखावह नसलं तरी कुटुंबप्रमुख म्हणून वावरताना आवश्‍यक वाटतं. या स्थितीत कमावत्या स्त्रीनं पारंपरिक पत्नीपद सोडून कमावत्या स्त्रीच्या भूमिकेतून घरात काही निर्णय (किमान स्वतःविषयीचे) घ्यायला सुरवात केली, तरी अजूनही ते सगळ्यांच्या पचनी पडताना दिसत नाही. तिने स्वतः काही निर्णय घेणं हा तिच्या पैशांचा तोरा वा माहेरच्यांची फूस मानली जाते. मुलाचे निर्णय मात्र घरात कायमच कौतुकाचे व स्वागतार्ह ठरू शकतात. त्यातही प्रामुख्यानं सांगावं वाटतं, कमावत्या पण शिक्षित घरात स्त्रियांना विरोध जास्त होतो. निम्न आर्थिक स्तरातील, कमी शिक्षित महिलांच्या घरात कित्येक वेळा नवरा व्यसनी, रोजंदारी करणारा असला तर घर चालवणं महिलेचीच जबाबदारी बनते. त्यामुळे परिस्थितीमुळे का होईना, ती स्वयंपूर्णता त्यांच्यात अधिक दिसते.

समुपदेशनासाठी आलेल्या रघुवीरबाबत सांगता येईल. रघुवीर व बाला दोघंही उच्चशिक्षित व चांगल्या कंपन्यांमधून काम करणारे. दोघांनी घरातला खर्च विभागून करायचा या तत्त्वावर घर चाललेलं. बालाला शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यात रस, तर रघुवीर प्रॉपर्टी घेणं पसंत करणारा. या दोघांच्या पैसे कुठं गुंतवायचे, या मतभिन्नतेमुळं घरात कायम वाद व्हायचे. या वादात बालानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. इथे कोणाचं चुकलं यावर चर्चा न करता, बालाला "स्व-निर्णय‘ सतत डावलला जाणं हे दुखावून गेल्याचं जाणवतं. पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा मानस नाही, तर पुरुषी मानसिकता बदलावी हा हेतू आहे.

पूर्वी महिला कमावत्या नव्हत्या, तरी गृहिणीपद सांभाळणारी प्रत्येक महिला ही आर्थिक व्यवस्थापनाचे कोणतेही अभ्यासक्रम न घेता घरखर्चासाठी मिळालेल्या पैशांतून घर चालवून, प्रसंगी काही पैसे बाजूला ठेवण्याचं कौशल्य बाळगून होती. मग, आताच्या कमावत्या महिलांमध्ये हे कौशल्य नक्कीच रुजलेलं आहे, त्यांना संधी द्यायला हवी.

« PreviousChapter ListNext »