Bookstruck

कला म्हणजे काय? 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आणि हे सारे घाणेरडे प्रकार जे दाखविले जातात, ते तरी शांतपणें, हंसत-खेळत दाखविण्यांत येतात का ? छे:, त्यांतहि आदळ-आपट, राग-क्रोध, पाशवी निष्ठुरता, माणुसकीचा अभाव, शिव्याशाप-हें सारें भरलेलेंच असतें.

हें सारें कलेसाठी करण्यांत येत असतें असें म्हणतात, आणि कला ही फार महत्त्वाची वस्तु आहे. कलेसाठी मानवी जीवनांची माती व्हावी, इतक्या का महत्त्वाची ती आहे? ज्या कलेसाठी लाखों लोक रात्रंदिवस श्रमत असतात, ज्या कलेसाठी अनेक लोकांच्या जीनाचा होम होतो, एवढेंच नव्हे तर जिच्या पायीं माणसामाणसांतील माणुसकी, सहानुभूति, व प्रेम यांचेंहि बलिदान करण्यांत येतें-ती कला आहे तरी काय ? ज्या कलेसाठी हें सारें होत आहे, ती कला दिवसेंदिवस कांहीतरी अस्पष्ट, संदिग्ध अशी वस्तु होत आहे; मनुष्याच्या बुध्दीला व हृदयाला अगम्य असें तिचें स्वरुप होत आहे. ज्या टीकेंत कलाप्रिय लोक पूर्वी स्वत:च्या मतांचें समर्थन केलेलें पहात असत, ती टीकासुध्दां हल्लींच्या काळांत आत्मनाशी झाली आहे. शेंकडों प्रकारचे टीकाकार  कलेवर लिहीत असतात. प्रत्येकाचें मत निराळें, दृष्टि वेगळी. हा म्हणतो कलेंत हें असूं नये; तो म्हणतो हें असूं नये. अशा प्रकारें प्रत्येकानें जें जें नाकारिलें, तें तें सारें जर कलेच्या क्षेत्रांतून वगळलें तर कलाच शिल्लक राहणार नाहीं ! कला मरुनच जाईल. प्रत्येक धार्मिक पंथ दुस-या पंथांना असत्य मानीत असतो व यामुळें सारेच पंथ जसे परस्परांच्या टीकेनें मरतात, त्याप्रमाणेंच त्या कलावानांचें होत आहे, हा त्याला ढकलून देतो व तो हयाला ढकलून देतो. परिणाम असा होतो कीं दोघेहि कलाक्षेत्राच्या बाहेर पडतात ! कलामंदिरांत ही धक्काबुक्की व झोंबाझोंबी चालली आहे. एक म्हणतो माझें येथे स्थान आहे, तुझें नाहीं; दुसरा त्याला तेंच म्हणतो. यामुळें आज कलामंदिरांत कोणीच दिसत नाहीं.

अर्वाचीन काळांतील कलावानांचीं भिन्न भिन्न मतें व विचार जर ऐकाल तर ही बजबजपुरी तुम्हांला दिसून येईल. एक कलापूजक भिन्न मताच्या मनुष्याला कलापूजक समजण्यास तयार नाहीं. कलेच्या सर्वच प्रांतांत अशी अंदाधुंदी आहे. काव्य असो नाटक असो, चित्र असो संगीत असो, नाना वाद व नाना मतें-यांचा गोंधळ माजला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धांतील पूर्वार्धांतील कवि उत्तरार्धांतील नव फ्रेंच कवींना मानीत नाहींत व हे उत्तरार्धांतील पूर्वकवींना मानीत नाहींत. प्रतीकवादी कवि गूढ कवींना मानींत नाहींत, आणि गूढ कवी तर कोणालाच मानावयास तयार नाहींत. कादंबरीच्या क्षेत्रांत तोच प्रकार यथार्थवादी, मानसवादी, निसर्गवादी, ध्येयवादी-सारे एकमेकांस काट देत आहेत. एकमेकांचा निषेध करीत आहेत. संगीत, नाटयकला, चित्रकला-याहि शाखांतून तीच रड. ज्याकलेसाठीं अपरंपार श्रम करावयास लावतात, ज्या कलेसाठी मोलाचीं मानवी जीवनें होमिली जातात, जिच्या पायीं मानवी जीवनाचासर्वांगीण सुंदर विकास होण्याचें बंद होतें, जिच्यामुळें मानवी जीवनातील प्रेम व बंधुता अस्तास जातात, अशी ही जी कला तिचें स्वरुपहि अद्याप निश्चित व नि:संदिग्ध अशा रीतीनें कोणी सांगितले नाही! तिची निर्दोष व्याख्या कोणी केली नाहीं, तिची व्याप्ती नीट कोणी दाखविली नाही ! कलापूजक कलेचा जो अर्थ करितात तो परस्परविरोधी असतो ! हा एक अर्थ  करतो, तर दुसरा निराळाच ! कलाप्रांतांत हें असें अराजक माजलें आहे. कला शब्दाचा अर्थ काय हें सांगणें सुतरां कठिण होऊन बसलें आहे. विशेषत: सत्कला कोणती, कल्याणमय श्रेयस्कर अशी मंगल कला कोणती, जिच्या वेदींवर-हा अपरंपार यज्ञ चालला आहे, जें हें अखंड बलिदान चाललें आहे-तेंहि सारे जिच्या मांगल्याकडे व कल्याणमयत्वाकडे पाहून आपण क्षम्य मानूं, अशी मंगलमयी कला कोणती हें सांगणें आज फारच अवघड व कठीण होऊन बसलें आहे.

« PreviousChapter ListNext »