Bookstruck

कला म्हणजे काय? 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ग्रँट अ‍ॅलन (१८७७) हा पेन्सरचाच अनुयायी आहे. शरीरसौंदर्यशास्त्र या आपल्या ग्रंथांत तो म्हणतो ''सौंदर्याचा उगम आकारांत, शरीरांत आहे. जे सुंदर त्याच्या चिंतनाने सौंदर्यविषयक आनंद मिळतो. परंतु सौंदर्याची कल्पना शारीरिकरीत्याच मिळते. कलेचा उगम क्रीडेंत आहे. जरूरीपेक्षा अधिक शारीरिक शक्ति असली म्हणजे आपण खेळतों. ज्यावेळेस ग्रहणशक्ति अधिक असते, त्यावेळेस आपण कलेकडे वळतों. कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्तेजन व उत्साह जी देते ती सुंदरता होय. सौंदर्याबद्दलची निरनिराळी मतें आढळतात. रुचिवैचित्र्यामुळे ही भिन्न मतें दिसून येतात. एकच वस्तू काहींना सुंदर वाटते, काहींना वाटत नाही. रुचीला वळण देतां येतें, ती सुसंस्कृत करतां येते. अत्यंत सुसंस्कृत व अत्यंत सुसंस्कृत व अत्यंत विचारी अशा माणसांनी दिलेल्या निर्णयावर आपण श्रध्दा राखिली पाहिजे. असे लोकच भावी पिढीच्या रुचीला आकार व वळण देत असतात.

केर (१८९३) याने कलेचें तत्त्व या विषयावर निबंध लिहिला आहे. तो म्हणतो की सौंदर्यामुळें आपणांस हया बाह्यजगांतील निरनिराळया भागांचे लौकर ज्ञान होतें. शास्त्रामध्ये एका भागाचा दुस-या भागाशी संबंध काय हे पहावें लागतें. परंतु कलेंत तसे काही नाही. आपणास भिन्न भिन्न भागांचे ज्ञान तात्काळ होतें. एक व अनेक यांतील विरोध कला दूर करीते, नियम व नियमांचे आविष्करण, द्रष्टा व दृश्य, कर्ता व कर्म, स्रष्टा व सृष्टी यांतील भेद कला नाहींसा करते. कला ऐक्य निर्माण करणारी आहे. सांन्त वस्तूंतील अज्ञेयता व अंधार यांपासून कला युक्त असते. कला स्वातंत्र्याला प्रगट करीते, स्वातंत्र्याला शोभविते.

नाईट (१८९३) सौंदर्याचे तत्त्वज्ञान या ग्रंथाच्या दुस-या भागांत तो म्हणतो ''सौंदर्य हे द्रष्टा व दृश्य यांचे एकीकरण होय.'' शेलिगच्या मताप्रमाणेच हे मत आहे. तो आणखी म्हणतो ''मनुष्याला जे समजेल व सुखद होईल, मनुष्याला जे अनुरूप असेल व शोभून दिसेल, ते निसर्गातून बाहेर काढणें म्हणजे सौंदर्य होय. सर्व सृष्टीला जे सामान्य असे आहे त्याची स्वतःच्या ठिकाणी जाणीव करून घेणे म्हणजे सौंदर्य होय. सृष्टीतील एकत्वाचा अनुभव करून घेणे म्हणजे सौंदर्य होय.

कला व सौंदर्य यांवर या जगांत इतके लिहिले गेले आहे की जी ही थोडीफार मते वर नमूद केली आहेत, ती म्हणजे काहीच नाही. आणि पुन्हा प्रत्येक दिवशी नवीन नवीन सौंदर्यमीमांसक उत्पन्न होतच आहेत व लिहीतही आहेत. सौंदर्य म्हणजे काय यांचे विवरण करीतांना, सौंदर्याची व्याख्या देताना पूर्वीच्या ग्रंथांत जसा गोंधळ व जसा परस्पर विरोध दिसून येतो, तसाच ह्या नवीन ग्रंथांतही तो दिसून येतोच. काही लेखक स्वतः विचाराचे श्रम न घेतां, डोकें न खाजवितां, उद्योग न करीता बामगर्टन किंवा हेगेल यांचीच थोडयाफार फरकाने री ओढताना दिसतात. काही लेखक सौंदर्याला व्यक्तिनिष्ठ करून सौंदर्य हे व्यक्तीच्या रुचीवर अवलंबून आहे असे मानितात व सौंदर्याचा पाया रुचीवर उभारितात आणि त्या रुचीची चर्चा करीत बसतात. अगदी अलीकडचे ताजे असे काही ग्रंथकार सौंदर्याचा उगम शरीरशास्त्राच्या नियमांत शोधू जातात. दुसरे पुन्हा असे काही आहेत की जे सौंदर्याच्या कल्पनेस अजिबात फांटा देऊन कलेचा उहापोह करीतात. सली (१८७४) ह्या पंडितानें आपल्या ग्रंथांत सौंदर्याच्या कल्पनेस दूर ठेविले. आहे. कलेची व्याख्या तो पुढीलप्रमाणे करितोः ''एखाद्या अमर वस्तूची निर्मिती म्हणजे कला; एखाद्या घडणा-या कृत्याची प्रतिकृती म्हणजे कला; कलावानास ती कृति निर्माण करीत असतांना प्रत्यक्ष कर्मरूप आनंद देणें व प्रेक्षकांस किंवा श्रोत्यास आनंदाची संवेदना देणें हा कलेचा हेतु असतो. हा आनंद उपभोगीत असताना कलावानास किंवा प्रेक्षक-श्रोत्यांस दुस-या कोणत्याही स्वार्थाचा स्पर्श झालेला नसतो, निहेंतुक व स्वार्थनिरपेक्ष असा तो आनंद असतो.

« PreviousChapter ListNext »