Bookstruck

कला म्हणजे काय? 36

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ख्रिस्तीधर्माचा उदय होण्यापूर्वी सुशिक्षित रोमन लोकांची जी मनःस्थिती होती, तीन मनःस्थिती मध्ययुगातील वरच्या वर्गातील लोकांची होती. बहुजनसमाजाचा जो धर्म, त्यावर त्यांची श्रध्दा नव्हती. जुन्या धर्माची जागा घेईल असा नवीन धर्मही त्याच्याजवळ नव्हता. जुने पटत नव्हते व नवीन दिसत नव्हते अशी त्यांची स्थिती होती. जुन्या मंदिरी ख्रिश्चनधर्मातील गोष्टीत त्यांना अर्थ दिसेना, म्हणून तेथे भावभक्ती  जडेना; आणि जेथे हृदय रमेल व बुध्दि नमेल असे नवीन धर्मतत्त्वही त्यांना मिळेना.

परंतु ख्रिस्तपूर्व सुशिक्षित रोमन लोक व हे मध्ययुगातील सुशिक्षित वरचे युरोपियन वर्ग त्यांच्याममध्ये एक फरक होता. रोमन लोकाची गृहदेवता व नृपदेवता यांच्यावरची जुनी श्रध्दा तर उडालीच होती, शिवाय ज्या रानटी लोकांना त्यांनी जिंकून घेतले, त्या रानटी लोकांच्या भारुडांनी व दंतकथांनी भरलेल्या धर्मातही त्यांना सारभूत असे काही दिसले नाही. पौष्टिक अशी धार्मिक भाकर त्यांना कोठेच मिळेना. ना घरी ना दारी. यामुळे सर्वस्वी नवीनच अशी जीवनाची कल्पना शोधून काढणे त्यांना आवश्यक झाले होते. परंतु मध्ययुगातील सुशिक्षित युरोपियनांची अशी केविलवाणी स्थिती नव्हती. ख्रिस्ताची खरी शिकवणूक तेथे होतीच. मानवजातीच्या प्रगतीचे, उन्नतीचे तिने चित्र रेखाटले होते. मानवी विकासाचा मार्ग आखून दिलेला होता. चर्चने ही शुध्द शिकवण विकृत केली होती इतकेच. या मंदिरांनी ख्रिस्ताच्या ख-या शिकवणुकीवर जो दाट शेंदरी पुटे चढविलेली होती, ती काढून आतले स्वच्छ व निर्मळ स्वरूप पाहणे एवढेच करावयास पाहिजे होते. ख्रिस्ताचा मार्ग पुन्हा झडझडून झाडला पाहिजे होता. या मंदिरी ख्रिस्तीधर्मापेक्षा ख्रिस्ताची खरी शिकवण-पूर्णपणे नसता पाळती आली, तरी जी काही पाळता आली असती, ती यथार्थतेने व नम्रपणे पाळण एवढेच त्याचे काम होते आणि काही लोकांना ते केलेही. वुइल्किफू, हस, ल्यूथर, कॅलव्हिन हे धर्मसुधारक येण्यापूर्वीच मंदिरबाह्य जो ख्रिश्चन धर्म होता, तो याच मार्गाने जात होता. असा एक प्रवाह मंदिराबाहेर जिवंत होताच. पॉलिशियन, बोगोमिलाइटस (प्रारंभीच्या चर्चच्या इतिहासात हे लोक फार प्रसिध्द आहेत. हे पूर्वेकडे राहत होते. मंदिरी ख्रिस्तीधर्म यांनी झुगारून दिला म्हणून त्यांचा अमानुष धळ करण्यात आला), त्याचप्रमाणे नंतर वाल्डेनस व दुसरे अ-मंदिरी ख्रिस्ती लोक ज्या सर्वाना नास्तिक मानण्यात येई व नरकाचे तावेतार समजण्यात येई. त्यांनी असेच धर्मजीवन चालविले होते. ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे जेवढे करता येईल तेवढे ते करीत होते व तसे वागत होते. परंतु ज्यांच्या हातात ना सत्ता, ना मत्ता, ना व्यापार, ना राज्यकारभार अशा दरिद्री लोकांनीच असे वागण्याचे तेज दाखविले, धैर्य दाखविले. बलवान व धनवान अशा लोकांपैकी फारच थोडया व्यक्तींनी हे दिव्य करून दाखविले. ऍसिसीचा फ्रॅत्र्निसस व इतर काही थोडया अपवादात्मक व्यक्ती यांनी ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा पूर्णपणे अंगिकार केला व त्यासाठी आपली सारी धनदौलत त्यांना सोडावी लागली. संपत्ति, सुख विलास, आराम यांचा त्याग करून त्यांनी दारिद्रयाला मिठी मारली. ख्रिस्ताच्या शिकवणीचा अंगिकार करणे म्हणजे दरिद्री होणे, सर्वांना समान मानणे, सर्वांनी भाऊ भाऊ होणे. वरच्या वर्गातील बहुतेकांना असे करण्याचे धैर्य नव्हते. मनातून मंदिरी धर्मावर तिळभरसुध्दा त्यांची श्रध्दा नव्हती तर ख्रिस्ताच्या ख-या शिकवणुकीचा अंगिकारही त्यांना करता येत नव्हता. हे वरचे लोक जे विशिष्ट हक्क उपभोगीत होते, ते हक्क ख्रिस्ताच्या शिकवणीचा अंगिकार केल्यावर यांना सोडून देणे भाग होते. ख्रिस्ताने असल्या जादा हक्कांचा निषेध केलेला होता. परंतु वरच्या वर्गातील लोकांना सत्ता व मत्ता यांच्यावर उभारलेल्या ऐषआरामी जीवनाची, स्वतःसाठी दुस-यांना राबवून घेणा-या जीवनाची सवय लागलेली होती, ही सवय, हे संस्कार, ही परंपरा त्यांच्या रोमरोगांत भिनलेली होती. मंदिरी ख्रिस्तीधर्मावर अंतरी श्रध्दा नाही व ख-या सोज्वल ख्रिस्ताच्या शिकवणीस जीवनात आणण्याचे धैर्य नाही अशा रीतीने या वरच्या वर्गातील श्रीमंतांना, सरदार - जहागिरदारांना, राजेमहाराजांना ह्या सर्व पृथ्वीवरील भुदेवांना धर्म म्हणून उरलाच नाही. मंदिरी धर्मातील बाह्य विधी वैगरे ते पाळीत, कारण असे करण्यात त्यांचा फायदा असे. ह्यामुळे ते बाह्य विधी पाळण्याचे सोंग करणे वरच्या वर्गातील लोकांना आवश्यक होते. परंतु यथार्थतेने पाहिले तर ह्या लोकांची कशावर श्रध्दा नव्हती, कशावर विश्वास नव्हता. पहिल्या शतकातील रोमन लोकांप्रमाणेच ते धर्महीन राहिले आणि अशा ह्या धर्महीन, ध्येयहीन लोकांच्या हाती धनदौलत होती, सत्ता व शक्ति होती, हेच लोक कलेस उत्तेजन देऊ शकत होते, कलेला वळण देणारे होते.

« PreviousChapter ListNext »