Bookstruck

कला म्हणजे काय? 47

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रकरण नववे

(कलेचे विकृत रूप कलेचा जो स्वाभाविक विषय, तो कलेने गमाविला; कलेममध्ये नवनवीन व स्वच्छ अशा भावनांच्या प्रवाहाचा अभाव; आजची कला अत्यंत क्षुद्र व हीन अशा तीनच भावना जागृत करते.)

मानवी समाजांत ज्या उच्च भावना निर्माण होतील-आणि त्या अर्थात् धार्मिक उगमांतूनच  उद्भवलेल्या व स्फुरलेल्या असणार-त्या देणे हे जे कलेचे मुख्य काम, ते आस्ते आस्ते दूरच राहत गेले. वरच्या वर्गातील युरोपियन लोकांची धर्मश्रध्दा उडून गेल्यामुळे, ते एकप्रकारे नास्तिक व श्रध्दाहीन झाल्यामुळे, समाजातील काही विशिष्ट समाजातील काही विशिष्ट वर्गांनी जास्तीत जास्त सुख देऊ पाहणारा एक मानवी व्यापार, एवढाच अर्थ त्यांच्या कलेला राहिला. वास्तविक कलेचे जे अनंत व अपार क्षेत्र, त्यांतून एक लहानसा तुकडा कापून घेऊन त्यालाच कला हे नाव देण्यात आले. ही कला विवक्षित लोकांना सुख देण्याचे एक साधन म्हणून रूढ झाली. कलेच्या विशाल क्षेत्रापासून एवढासा तुकडाच घेऊन त्यालाच संपूर्ण कला असे मानल्याने युरोपियन समाजावर त्याचे काय नैतिक परिणाम झाले ते पाहणे जरी दूर ठेविले तरी, ज्या क्षुद्र भागाची संपूर्ण कलेचे नांव घेण्याची लायकी व पात्रता नव्हती, त्या भागाचे स्तोम माजविल्यामुळे, त्या भागाचे नसते महत्त्व वाढविल्यामुळे, त्या नसत्या महत्त्वाचे समर्थन केल्यामुळे, कलेचे असे विकृत स्वरूप केले गेल्यामुळे, स्वत: कलाच विकळ झाली, दुबळी झाली व जवळजवळ नष्टप्राय झाली. या विकृत कलेने कला मारूनच टाकली असे म्हणाना. या अशा करण्याचा पहिला मोठा परिणाम झाला होता तो हा की, कलेला योग्य असा जो अनंत व अपार, विविध व गंभीर असा धर्म हा जो विषय त्याला कला मुकली. दुसरा परिणाम म्हणजे काही विवक्षित वर्गाचेच मूठभर लोक डोळयांसमोर ठेवून कला निर्माण होत गेल्यामुळे, कलेतील आकारसौंदर्याची हानी झाली. नानाविधरूपे झाली; नानाविधरूपे कलेला घेता येत नाहीशी झाली. तोच तो आकार, तोच तो सांचा. कला कोप-यांत पडणारी अशी झाली. आणि तिसरा परिणाम-हा सर्वांत महत्त्वाचा होय-झाला तो असा की कला कृत्रिम झाली. कलेतील सहजता, सरळता, उत्कटता निघून गेली. कलेतील कळकळ व तळमळ दिसत नाहीशी झाली. कलेमध्ये सहृदयता राहिली नाही. अंत:करणपूर्वकता पार लोपली. बुध्दिप्रधान, दुर्बोध व लाक्षणिक अशी ती झाली. तिच्यांत राग राहिला नाही, हृदय उरले नाही.

पहिला परिणाम वर जो सांगितला तो विषयदारिद्रयाचा. कलेला विषयच फार तुटपुंजा व अल्प राहिला. जी नवीन भावनांचा अनुभव आणून देते ती खरी कलाकृती होय. पूर्वी न अनुभवलेल्या अशा भावना ज्या कृतीपासून प्राप्त होतात, ती खरी प्राणवान् कलाकृती होय. जे पूर्वीचे ज्ञान होते, त्याचे पुनरूच्चारण करणे म्हणजे ज्याप्रमाणे खरी वैचारिक कृती नव्हे, तर विचार देणारी, नवीन दृष्टी देणारी जी कृती, तीच खरी अभिजात बौध्दिक व वैचारिक कृती असे आपण मानतो. त्याचप्रमाणे मानवी जीवनांत नवीन भावनाप्रवाह जी आणून सोडील तीच खरी कलाकृती. मुलांवर किंवा तरुणांवर, त्यांनी ज्या भावना पूर्वी अनुभवलेल्या नसतात, त्या भावना त्यांच्या हृदयांत जागृत करणा-या कलाकृतींचा फार परिणाम होत असतो, याचे कारण हेच होय.

« PreviousChapter ListNext »