Bookstruck

कला म्हणजे काय? 101

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सौंदर्य हे कलेचे खरे प्रमाण नाही असे मी पूर्वी म्हटले आहे आणि आता अलंकार वगैरे वस्तूही मी कलात्मक म्हणून सांगत आहे. हा वदतोव्याघात आहे असे कोणी म्हणेल; परंतु असा कोणी टोमणा मारलाच तर तो अनाठायी आहे. कारण सर्व अलंकारांचाही हेतू सौंदर्य नसून भावनादान हाच असतो. (ती भावना रेखा व रंग यांच्या मिश्रणाबद्दलची, आदराची व कौतुकाचीही अशी असेल.) कलावानाने अनुभविलेली भावनाच त्या अलंकारांतूनही तो देऊ इच्छित असतो. मी काही बदल करीत नाही, निराळे सांगत नाही. कला जी होती तीच आहे. जशी असली पाहिजे तशीच आहे. कला म्हणजे कलावानाने आपल्या भावनांनी दुस-यांना स्पर्श करणे, दुस-यांच्या हृदयांत समान भावना जागृत करणे-हाच अर्थ येथेही अलंकारांत आहे, या अनेक भावनांत जे दृष्टीस सुख होते, दृष्टीला जो आनंद होतो, त्याचीही एक भावना असते; काही वस्तू थोडया लोकांच्याच दृष्टीला सुखवितील; तर काही पुष्कळांना सुखवितील. अलंकार हे सर्वांच्या दृष्टीला सुख देतात. निसर्गातील एखादा विशिष्ट देखावा सर्वांना नाही समजणार किंवा सुखविणार, परंतु अलंकार या कुतस्तक येथील असो किंवा रोम-ग्रीस येथील असो, ते पाहून सारे कौतुक करतील. ही कौतुकाची भावना सर्वांच्या हृदयांत उत्पन्न होईल. यासाठी ही तुच्छ मानली गेलेली कला, व्यापक कला म्हणून मानली गेली पाहिजे. असंग्राहक, अपवादात्मक,  अव्यापक, आढयताखोर अशा चित्रांपेक्षा व शिल्पांपेक्षा ही अलंकारांची कला, अधिक यथार्थ कला हणून समजली गेली पाहिजे. सांसारिकांच्या, विश्वजनांच्या कलेत तिला स्थान असलेच पाहिजे.

कलेचे मुख्य काम म्हणजे भावनादान; ह्या दृष्टीने कलेकडे पाहता ख-या चांगल्या ख्रिश्चन कलेचे दोनच प्रकार आहेत. थोर धर्मदृष्टी देणारी कला व विश्वजनांच्या भावना रंगविणारी कला. ह्या दोन प्रकारांशिवाय ठरलेली इतर सारी कला त्याज्य समजावी. जी कला जोडण्याऐवजी तोडते, ती कला काय कामाची? साहित्यामध्ये पुष्कळ कादंब-या व पुष्कळ काव्ये अशा दृष्टीने टाकाऊच आहेत. विशिष्ट राष्ट्रांची, विशिष्ट धार्मिक पंथांची भावना त्यांत असते; किंवा श्रीमंत व मिजासी लोक, आळशी व खावू लोक-त्यांच्याच भावना त्यांतून दाखविलेल्या असतात. वरच्या वर्गाचे खोटे कुलाभिमान व अहंकार, त्यांचे नबाबी थाट, त्यांचे रूबाब, त्यांच्या मजलसी व त्यांच्या मिजासी, त्यांची श्रीमंती सुख-दु:खे, त्यांच्या निराशा, त्यांची असामाधाने, त्यांचे कंटाळे, त्यांचे विलास, त्यांची वैयक्तिक कारस्थाने, ह्याच गोष्टी त्यांतून असतात. ह्या दुष्ट व फाजील शिष्टभावना बहुजनसमाजाला समजत नाहीत.

चित्रकलेतही जी चित्रे विशिष्ट राष्ट्रे, विशिष्ट पंथ, विशिष्ट मते यांच्याच भावना देणारी असतील, ती त्याज्य समजावी. श्रीमंत व कर्मशून्य जीवनांतील मोह, विलास व मौज दाखविणारी चित्रे त्याज्य समजावी; जी प्रतीके काही विशिष्ट तज्ज्ञांसच समजतील अशी प्रतीकात्मक चित्रे त्याज्य समजावी. तसेच ते कृत्रिम रागदारीचे जलसे, ती बीथोव्हेनची संगीते, सारी त्याज्य समजावी. कारण ह्या संगीतात असणारा विषय हा सर्वसामान्य जनतेचा नसतो. ज्यांची जीवने काही विशिष्ट प्रकारच्या पध्दतीनेच वाढलेली असतात, ज्यांच्या मज्जातंतूंना व इंद्रियांना काहीतरी प्रक्षुब्ध सदैव पाहिजे असते, अशांनाच ही कृत्रिम असंग्राहक गुंतागुंतीची व क्लिष्ट संगीते समजणार!

बीथोव्हेनची ९ वी रचना-ती काय उत्कृष्ट कला नव्हे; असे रागारागाने मला विचारण्यात येते.

« PreviousChapter ListNext »