Bookstruck

कला म्हणजे काय? 104

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मानवजातीच्या सुधारणेचे महत्त्वाचे साधन जे सत्कला, त्या कलेचा व्यापार समाजात चालू नसल्यामुळे असा परिणाम होत आहे. परंतु विकृत कलेचा व्यापार अव्याहत व अप्रतिहत सुरूच आहे व त्याचे फारच भयावह व नाशकर असे दुष्परिणाम होऊन राहिले आहेत.

असत् व कृत्रिम कलेच्या प्रसारमुळे पहिला दुष्परिणाम जो पटकन् डोळयांत भरतो तो म्हणजे ज्या वस्तू उपयोगाच्या नाहीत, एवढेच नव्हे तर ज्या उलट अपायकारक आहेत, अशा वस्तूंचे ढीग निर्माण करण्यासाठी लाखो लोकांना श्रमावे लागत आहे; त्यासाठी अपरंपार पैसा खर्च होत आहे, आणि या सर्वांहूनही वाईट गोष्ट म्हणजे या अनावश्यक व अहितकर कामांत अमोल अशी मानवीजीवने फुकट जात आहेत. दहाच नाही तर बाराबारा, चौदा-चौदा तास सारखे तास काम करीत राहणे, दिवसाचं नव्हे तर रात्रीही काम करून घामाघूम होणे, कुठेही इकडे-तिकडे लक्ष देण्यास अवसर नाही, कारण यंत्राशी साखी गाठ-हात सापडायचा, बोटे तुटायची म्हणून एकाग्र मनाने काम करीत राहणे, जी पुस्तके मानव समाजात, दुर्गुणांचा प्रसार करणार आहेत अशा पुस्तकांचे खिळे जुळविण्यात दमून जाणे, कोणी नाटकगृहात पडेल ते काम करीत थकून जात आहे, कोणी जलशाचे ठिकाणी तर कोणी प्रदर्शनाचे ठिकाणी मरत आहे. अशा या नानाविध दुर्गुणांचे साम्राज्य पसरविणा-या गोष्टींत लाखो मजूर अहोरात्र मरेमरेतो कामे करत असतात. या लाखो लोकांची किती उपासमार होते, त्यांना किती कष्ट असतात, मुलाबाळांजवळ, बायकोजवळ प्रेमाने बोलावयासही त्याला कसा अवसर नसतो, आला काम करून, खाल्ला असेल तो घास, पडला डासाच्या घोंगाव्यातच अंथरूणावर, उठला की चालला कामावर. मुलाबाळांची आबाळ, ना दवा ना शिक्षण, जीवनात ना आनंद, ना सुख, ना विश्रांती, ना काही. अशा ह्या कामाने बेजार झालेल्यांची कल्पना करणे  म्हणजेच हृदयाचा थरकाप होतो, अंगावर काटा उभा राहतो, डोळे संतापाने व करूणेने ओले होतात. परंतु यापेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे, हृदयाला पीळ पाडणारी करूणकथा म्हणजे-लहान लहान कोवळी बाळे-ज्यांच्या ओठावरचा अजून जार वाळला नाही, आईच्या मांडीवर जवळ हसून खेळून दिवस नेण्याचे ज्यांचे वय, जी पुढे चांगली होऊ शकतील, सर्व सत् व मंगल आपल्या जीवनात आणू शकतील, अशा विकासोन्मुख ह्या सुंदर कळया-परंतु ह्यांना लहानपणापासून असल्या कामातच पडावे लागते. रोज सहा सहा, आठ-आठ, किंवा दहा दहा तासही काही मुलांना वाजवीतच बसावे लागते; काही मुलांना रद्दी असे गाणेच शिकावे लागते; काहींना आपल्या अवयवांना नाना प्रकारची वळणे देण्याचा, आळेपिळे देण्याचाच अभ्यास करावा लागतो; काहींना अंगठयावर चालणे, पाय डोक्यावर घेणे, डोक्यावर चालणे, ह्याच गोष्टी शिकत बसावे लागते; काहींना पोषाख करून अभिनययुक्त कविता म्हणत बसावे लागते; काही मुले नग्न अशा आकृतीच काढावयास शिकत असतात; काहींना ठराविक गद्यपद्यांच्या नियमांप्रमाणे काही लिहून आणावे लागत असते; अशा या मनुष्यांस न शोभेशा उद्योगांत वयात आल्यावरसुध्दा काम करीत राहावे लागते, शिकत राहावे लागते. असल्या ह्या भिकार व अर्थहीन गोष्टींत या सर्व जीवांची शारीरिक, मानसिक व बौध्दिक शक्ती खर्च व्हावी ह्याहून खेदकारक व उद्वेगजनक दुसरे काय आहे? सर्कशीतील लहान लहान मुले आपले पाय मानेवर घेऊन जेव्हा काही खेळ करून दाखवीत असतात तेव्हा कोणी कोणी त्या मुलांची कीव येऊन ''काय हे रानटी व क्रूर प्रकार'' असे उद्गार काढीत असतात. परंतु दहा दहा वर्षांच्या मुलांनी नावात व तमाशेवजा नाटकांत कामे करावीत हेही तितकेच दुष्ट व क्रूर आहे. नव्हे त्याहूनही वाईट आहे; आणि दहा दहा वर्षांच्या मुलांना लॅटिन भाषेचे व्याकरण पाठ करावयास लावणे, ते निरनिराळे अपवाद तोंडपाठ करावयास लावणे, पुढच्या साहित्यसेवेची तयारी म्हणून त्याच्या डोक्यात हे कोंबू पाहाणे-ह्या क्रूरपणाला तर सीमाच नाही, अशी ही सारी मुले पुढे तनाने व मनाने दुबळी व कुरूप होतात. त्यांची नीती शिथील होते, त्यांची जीवने मातीमोल होतात. मनुष्याने जे जे खरोखर केले पाहिजे, ते ते करावयास ही मुले असमर्थ होतात, नालायक होतात. जीवनोपयोगी कोणतंही काम करण्याची पात्रता व धमक त्यांच्यांत उरत नाही. श्रीमंतांचे खुषमस्करे, श्रीमंतांचे विदूषक हा त्यांचा सामाजिक दर्जा राहतो. मानव्याची थोरवी ते पार विसरून जातात; मनुष्यत्वाचा मोठेपणा ते ओळखीतनासे होतात. लोकांनी टाळया वाजवाव्या व वन्स मोअर म्हणावे यासाठीच ते हपापलेले असतात. ते पोकळ अभिमान, ऐट, मिजास यांना बळी पडतात. वाहवा मिळविण्यासाठी आपली सारी मानसिक शक्ती ते खर्च करतात आणि सर्वांत दु:खाची गोष्ट ही की ज्या कलेसाठी म्हणून स्वत:चे असे सर्वस्वी नुकसान ते करून घेतात, त्या कलेची खरी सेवा व खरी पूजा त्यांच्या हातून होत नाही ती नाहीच! कलेला ते विद्रूप करतात, कलेला अवकळा आणतात. कलेचे हित होण्याऐवजी त्यांच्याकडून हानीच होते. स्वत:चे थोर जीवनही भ्रष्ट झाले व ख-या कलासेवेलाही मुकले. कारण ख-या कलेचे शिक्षण त्यांना मिळतच नसते. घरीदारी, शाळांत, संस्थांत, खोटी कला कशी निर्माण करावी, कलेचे सोंग कसे आणावे, कलेची बतावणी कशी करावी ह्याच गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. हे शिकून शिकून त्यांची जीवने इतकी बिघडतात, त्यांच्या रूची अशा काही चमत्कारिक व कृत्रिम होतात की सत्कला निर्माण करण्यास ते नालायक बनतात. सत्कलानिर्मितीची शक्ती ते कायमची गमावून बसतात. ती शक्ती मरूनच जाते; आणि तुच्छ, क्षुद्र व सारहीन अशा कलेचे ते पूजक व अनुयायी होतात; आणि अशीच कला आज समाजात जिकडे तिकडे दिसत आहे. अशा कलेलाच अपार पूर आलेला आहे. कला हे साधन बिघडल्याने मानवी जीवनांचा -हास व अध:पात हा पहिला मोठा दुष्परिणाम होय.

« PreviousChapter ListNext »