Bookstruck

कला म्हणजे काय? 106

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शस्त्रास्त्रांनी समोर उभे राहणा-याला भीतीचा रामराम व संताला प्रीतीचा प्रणाम-या दोन गोष्टी त्यांना पूर्णपणे अनुभवाने पटलेल्या असतात. परंतु या शेतकरी, कामकरी व मुलांना असे दिसून येते की, शारीरिक किंवा आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्यांना मान दिला जातो,  ज्यांचा सत्कार करण्यात येतो, त्याच्याशिवाय दुसरेही काही लोक असतात की ज्यांची स्तुति व पूजा संतमहात्म्यांपेक्षा किंवा शूर वीरांपेक्षा अधिक केली जात असते. आणि त्यांच्याजवळ असते काय तर कोणी चांगले गातात, कोणी काव्ये रचतात, कोणी नाचतात, कोणी रंगवितात, या शेतक-यांना, मजुरांना व त्या मुलांना असे दिसते की या गाणा-या वाजवणा-या लोकांना, या नाचणा-या नटणा-या लोकांना, या काव्येनाटके लिहिणा-यांना, या चित्रे रेखाटणा-यांना लक्षावधी रूपये मिळत असतात, संतांना किंवा वीरांना मिळत नाही असा बहुमान मिळतो. हे सारे पाहून आश्चर्य वाटते, ते घोटाळयात पडतात. हे सार किमर्थ ते त्यांना समजत नाही.

पुष्किनला मरून बरोबर ५० वर्षे झाली होती. त्याच्या ग्रंथांच्या स्वस्त आवृत्त्या निघून नुकत्याच मिळू लागल्या होत्या. अर्धशतसांवत्सिक उत्सव होऊन मास्को शहरात त्याचा पुतळा उभारण्यात आला. तो पुतळा जेंव्हा उभारण्यात आला तेंव्हा मला कितीतरी शेतक-यांची व कामक-यांची पत्रे आली. पुष्किनला एवढा मान का देण्यात आला हाच प्रश्न त्या सर्वांनी  विचारला होता. आणि साराटोव्ह येथे राहणारा एक सुशिक्षित मनुष्यही संतापून मला भेटावयास आला होता. पुष्किनचा पुतळा उभारण्यात धर्माने तरी सामील व्हावयास नको होते. धर्मोपदेशकांनी तरी या समारंभावर बहिष्कार घातला पाहिजे होता असे त्याला वाटत होते. धर्मोपदेशकांची हजेरी घेण्यासाठी, त्यांची कानउघाडणी करण्यासाठी, त्याचे खरे हीन असे व ओंगळ रूप प्रकट करण्यासाठी तो जात होता.

सामान्य लोकांच्या मनाची काय स्थिती होत असेल, त्याची कल्पना करा. बादशहा, सारे बडे सरकारी अधिकारी, धर्मोपदेशक, रशियातील थोर थोर उत्तमोत्तम वेचक माणसे-सारी जमून रशियाचे भूषण, रशियाचा हितकर्ता, महात्मा पुष्किन याचा पुतळा मोठया समारंभाने उभारतात व त्या पुष्किनचे नावही आतापर्यंत खेडयापाडयातील कोटयवधी माणसांस माहीत नसते! त्या लोकांना वाटते एवढा मोठा पुष्किन पण त्यांचे नावही आपण पूर्वी कसे ऐकले नाही? त्यांना चुकचुक लागते. जिकडे तिकडे वर्तमानपत्रांतून पुष्किन पुष्किन त्यांना ऐकू येते. साहजिकच मग त्यांची अशी समजूत होते की ज्याअर्थी हा जो कोणी पुष्किन आहे त्याला इतका मान दिला जात आहे, त्याअर्थी तो कोणीतरी थोर असलाच पाहिजे. ही व्यक्ती असाधारण व लोकोत्तर असली पाहिजे, याने तलवार तरी गाजविली असली पाहिजे, किंवा चारित्र्याची व पावित्र्याची, दयेची व प्रेमाची मूर्ती तरी तो असला पाहिजे. पुष्किनबद्दलची माहिती ते मिळवू लागतात. त्यांना कळते की पुष्किन हा पराक्रमी वीर नव्हता, तर तो एक सामान्य माणूसच होता. पुष्किन हा एक लेखक होता. हा लेखक मोठा संत असला पाहिजे जसा मग ते तर्क करू लागतात. याने मानवजातीला सुंदर व घोर उपदेश दिला असेल, दिव्य व थोर प्रेमाची त्याने गीते लिहिली असतील, फार पवित्र व निष्कलंक असा हा असेल असे त्यांना वाटते. पुष्किनची एकतरी ती धन्य  ओळ, ती त्या संताची अभंग व अमर वाणी केंव्हा वाचू असे त्यांना होतं. परंतु पुष्किन हा धुतल्या तांदळासारखा निर्मळ पुरूष नव्हता, धर्माचे बंधन तो फारसे मानीत नसे, त्याच्या वर्तनात संयमाला फाटाच बहुतेक दिलेला असे, द्वंद्वाममध्ये दुस-याला मारीत असता तो मारला गेला, आणि याने मानवजातीची सेवा केली ती एवढीच की काही प्रेमविषयक काव्य त्याने केले आहे व तेही अनेक ठिकाणी अश्लील व सद्भिरुचीस सोडून असे आहे, इत्यादि माहिती जेंव्हा त्यांना मिळते, त्यावेळेस त्यांच्या मनाची काय स्थिती होत असेल त्याची कल्पना करा.

अलेक्झांडर, चंगीझखान, नेपोलियन हे मोठे होते हे सामान्य मनुष्य समजतो. कारण या तिघांपैकी कोणाही, एकाने आपला सहज धुव्वा उडविला असता ही गोष्ट त्याला समजते. वृध्द, ख्रिस्त, सॉकेटिस हेहि महात्मे होते ही गोष्ट त्याला समजते. आपण व इतर सर्व लोकांनी त्यांच्यासारखे थोडेफार व्हावे असेही त्याला वाटते. परंतु स्त्रियांच्या प्रेमाबद्दल कविता लिहिणारा मोठा कसा हे कोडे मात्र त्यांना उलगडत नाही.

« PreviousChapter ListNext »