Bookstruck

कला म्हणजे काय? 109

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ज्यावेळेस असे विचार सिध्दांत म्हणून, जीवनतत्त्व म्हणून मांडिले जातात, त्यावेळेस जरा भीति वाटते, जरा धोका वाटतो, हृदयाला धक्काही जरा बसतो. आणि सौंदर्योपासक जी कला तिच्या ध्येयांतही वास्तविक हेच विचार अंतर्भूत आहेत. वरच्या वर्गातील लोकांच्या कलेने हेच बेदरकार, बेफिकीर व बेगुमान बलाचे तत्त्वमान, बळवंत पुरुषोत्तमाचे ध्येय लोकांस शिकविले आहे. पूर्वी होऊन गेलेले नीरो, स्टेकारेझीन, बंगीझखान, रॉबर्ट मेंकेअर, नेपोलियन यांचेही असेच विचार होते, हेच ध्येय होते. त्यांचे साथीदार, त्यांचे सहकारी व सोबती ह्याच ध्येयाची पूजा करणारे होते. आजची कलाही आपल्या सर्व सामर्थ्याने व शक्तीने हेच शक्तीचे ध्येय उचलून धरीत आहे.

जे सत् आहे व सत्य आहे, त्याच्या ऐवजी जे सुखकर आहे व सुंदर आहे ते ध्येय मानणे हाच आपल्या समाजात चालत आलेल्या व चालू असलेल्या विकृत कलेचा चौथा मोठा दुष्परिणाम होय. अशा कलेचा सर्व मानवजातीत जर प्रसार झाला तर तिचे काय होईल याची कल्पना करण्यासही मन भिते आणि ही कला पसरूलागलीही आहे.

आणकी पाचवा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणजे युरोपियन समाजातील वरच्या वर्गातील या कलेचा अगदी प्रत्यक्ष नैतिक परिणाम होत आहे; सर्व समाजाला ही कला बिघडवीत आहे; अत्यंत हीन भावना समाजाला ती देत आहे, खोटे विचार, खोटया भावना, खोटया कल्पना, संकुचित देशाभिमानाच्या कल्पना दुस-यांना तुच्छ मानणा-या कल्पना-इत्यादि मानवजातीला विघातक अशा भावना आणि सर्वांत वाईट म्हणजे अनिर्बंध अशा विषयलोलुपतेच्या भावना ही कला राजरोस उजळ माथ्याने समाजाच्या पदरात बांधीत आहे, समाजाच्या गळी उतरवीत आहे.

लोकांमध्ये जे अमान आहे, त्या अज्ञानाच्या कारणांकडे नीट लक्ष दिले तर शाळा कमी आहेत किंवा वाचनालये कमी आहेत हे त्या अज्ञानाचे आम्हांला सांगण्यात येणारे कारण खरे नाही असे दिसून येईल. ज्या नानाप्रकारच्या देशभक्तीच्या व धर्मसमजुतीच्या दुष्ट, संकुचित व असत् रूढी लोकांत पसरलेल्या आहेत, ज्या रूढींशी त्यांचे जीवन एकरूप झाले आहे, ज्या रूढी त्यांच्या रोमरोमांत भिनल्या आहेत, हाडीमाशी खिळल्या आहेत, ज्या असत् रूढी व भावना आजची कलाही प्रत्यही दृढमूल करीत आहे, त्या रूढी व भावना हे या अज्ञानाचे कारण आहे. मंदिरी धर्मातील रूढी नाना प्रार्थनांतून, नाना स्तोत्रांतून, चित्रांतून, शिल्पांतून, मूर्ती, पुतळे इत्यादींतून संगीत, गायनवादन इत्यादींद्वारा, धार्मिक समारंभातून होणारे नाटयप्रवेश, वगैरे यातूनही दिल्या जात असतात, पोसल्या जात असतात. देशाभिमानाच्या संकुचित व दुष्ट रूढी गोष्टींतून, गीतांतून (ज्या गोष्टी व कविता लहान मुलांमुलींच्या शाळेत मुद्दाम शिकविण्यात येत असतात), मोठमोठया सभांतून, मिरवणुकींतून, लष्करी चित्रांतून, शूरवीरांचे, दुस-यास लुटणा-या वीरांचे पुतळे उभारून पोसल्या जात असतात.

कलेच्या सर्वच प्रांतातून कोटा संकुचित धर्म व खोटा संकुचित देशाभिमानाच्या भावना यांचा फैलाव सतत केला जात आहे. राष्ट्राराष्ट्रांतून द्वेष व मत्सर उत्पन्न केले जात आहेत. परस्परास विरोध वगैरे माजविली जात आहेत. कलेने जर असे केले नसते, कलेकडून ही दारू जर पाजली गेली नसती, तर लोक केंव्हाच शहाणे, सुज्ञ, प्रेमळ व विचारी झाले असते; केंव्हाच त्यांच्या जीवनात प्रकाश आला असता.

परंतु केवळ धार्मिक व देशाभिमानाच्या बाबतीतच कला आपणास पतित करीत आहे असे नव्हे; सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा जो स्त्रीपुरूषविषयक संबंध त्या बाबतीतही लोकांची जर कोणी फसवणूक केली असेल, त्या बाबतीतही लोकांना विपरीत विचार जर कोणी दिले असतील तर ते मुख्यत्वे करून या कलेनेच होय. आपणा सर्वांस स्वत:चा अनुभव आहेच व जे आईबाप आहेत त्यांना आपल्या वयात आलेल्या मुलांच्या बाबतीत माहीतच असेल की किती भयंकर मानसिक व शारीरिक कष्ट, किती अनाठायी शक्तिव्यय होत आहे तो; या सर्वांचे कारण अनिर्बंध वैषयीक वासना आणि वैषयीक वासनांची बेबंदशाही.

« PreviousChapter ListNext »