Bookstruck

कला म्हणजे काय? 127

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशी आशा करूया की मी कलेच्या बाबतीत हा जसा प्रयत्न केला आहे, तसाच शास्त्राच्या बाबतीतही कोणी करील. कलेसाठी म्हणून कला या विचारातील फोलपणा ज्याप्रमाणे मी दाखवून दिला आहे त्याप्रमाणेच शास्त्रासाठी म्हणून शास्त्र या विचारसरणीतीलही फोलपणा कोणाकडून व्यक्त केला जाईल, उघड केला जाईल. ख्रिस्ताची खरी शिकवण शास्त्रानेही अंगिकारणे किती आवश्यक आहे ते दाखवून दिले जाईल. जे ज्ञान आपणाजवळ आज आहे व ज्याचा आपणास मोठा अभिमान वाटतो, त्या ज्ञानाची खरी किंमत ख्रिस्ताच्या ख-या शिकवणीच्या कसोटीवरूनच करण्यात येईल. भौतिक शास्त्राचे ज्ञान हे कमी महत्त्वाचे व दुय्यम दर्जाचे मानले गेले पाहिजे. धार्मिक, आर्थिक व सामाजिक प्रश्नांचे ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे असे सिध्द केले पाहिजे आणि जीवनाच्या महान प्रश्नांसंबंधीचे हे ज्ञान काही विवक्षित वरच्या वर्गांनाच मार्गदर्शक न राहता ते सर्व समाजाच्या मालकीचे होऊन सर्वांना मार्गदर्शक होईल असे झाले पाहिजे. हे ज्ञान म्हणजे सर्वांचा ठेवा, सर्वांचा आनंद असे झाले पाहिजे. जो जो जिज्ञासू आहे, स्वतंत्र बुध्दीचा आहे. त्याला त्याला हे ज्ञान मोकळे असले पाहिजे. ज्यांनी वरच्या वर्गाच्या साहाय्याशिवाय जीवनाच्या ख-या शास्त्राची सदैव वाढच केलेली आहे असे जे कळकळीचे सत्यपूजक, सत्यशोधक व सत्यसेवक, त्यांना हे नवज्ञान खुले राहिले पाहिजे.

सामाजिक शास्त्रांनी जीवनाचे गंभीर प्रश्न सोडवावयाचे व भौतिकशास्त्रांनी रूढींना तिलांजली द्यावयाची, भौतिकशास्त्रांनी नुसत्या भीती दूर केल्या पाहिजेत. कार्यकारणमीमांसा समजावून दिली पाहिजे. धर्माच्या नावाखाली, कायद्याच्या नावाखाली व इतर अनेक रीतींनी मानवजातीत जे अन्याय होतात, ज्या फसवणुकी होतात त्यांना या शास्त्रांनी आळा घातला पाहिजे. या शास्त्रांचा इतक्यापुरताच अभ्यास करण्यात येईल किंवा विशिष्ट वर्गाचीच स्थिती न सुधारता सर्व मानवांची स्थिती जर खरोखर काही शोधांनी सुधारणार असेल तर त्यासाठी म्हणून या शास्त्रांचा अभ्यास करण्यात येईल.

आजची सामाजिक शास्त्रे जे आहे तेच उचलून धरीत आहेत व भौतिकशास्त्रे निरुपयोगी ज्ञान जमा करीत आहेत. सामाजिक शास्त्रे जुन्याच्या समर्थनासाठी दुर्बोध शब्दजाल निर्मीत आहेत, भौतिकशास्त्रे काही लोकांच्याच सुखाकडे पहात आहेत. हे सर्व जाऊन शास्त्रे वर सांगितल्याप्रमाणे जेंव्हा करू लागतील तेंव्हा त्यांना खरे नावरूप येईल; तेंव्हाच शास्त्रे प्राणवान होतील, शास्त्र या पदवीस पात्र होतील. सर्व मानवजातीस समजेल असे ध्येय शास्त्राला असेल. हे ध्येय निश्चित असेल, विवेकाने ठरविलेले असेल. आजच्या काळातील ज्या थोर धार्मिक भावना-प्रेमाच्या व ऐक्याच्या भावना-त्यातून निघणारी सत्ये मानवाच्या बुध्दीस समजावून द्यावयाची, त्यातून निघणारे सिध्दांत सर्वांना पटवून द्यावयाचे हे शास्त्राचे खरे काम आहे व शास्त्र ते अंगिकारील. शास्त्रे विस्कळीत न राहता सर्वांचे सुसंवादीत व एका ध्येयार्थ झटणारे असे सच्छास्त्र निर्माण होईल.

शास्त्राने असे सत्स्वरूप घेतल्यावर त्याच्यावर अवलंबून असणारी जी कला, तिलाही योग्य असे स्वरूप प्राप्त होईल. शास्त्राइतकीच मानवजातीच्या प्रगतीस कला साधनीभूत होईल.

कला म्हणजे केवळ सुख नव्हे, क्षणभर मिळालेला विरंगुळा नव्हे, किंवा करमणूकही नव्हे. कला ही फार महान वस्तू आहे. मानवी जीवनाच्या विकासाचे ते थोर साधन आहे. थोर विचारांना कला भावनांचे रूप देते. बुध्दीच्या अंगणात असलेल्या विचारांना हृदयाच्या दिवाणखान्यात आणून सोडणे हे कलेचे काम आहे. मानवाचे ऐक्य, सर्वत्र बंधुभाव, ही आजच्या काळातील धर्मदृष्टी आहे. सर्वांना ती दिसत आहे, आज आपणास कळून चुकले आहे की व्यक्तीचे सुख व हित हे सर्व मानवाच्या ऐक्यावर अवलंबून आहे. व्यक्तीचे ऐहिक वा पारलौकिक कल्याण या बंधुभावावर अवलंबून आहे. ही धर्मदृष्टी जीवनात कशी आणावी, समता व बंधुभाव प्रत्यक्ष आचारात कशाने येईल याचा मार्ग शास्त्राने दाखवावा व कलेने हे शास्त्रदर्शित विचार रसाळ करून सांगावे. शास्त्राने दाखविलेला मार्ग सुंदर करून दाखविणे, तो सर्वांना आवडेल असे करणे हे कलेचे काम आहे. प्रखर सत्याला चंद्राप्रमाणे रमणीय व आल्हादकर बनविणे हे कलेचे काम आहे. विचारांना भावनामय करणे हे कलेचे काम आहे.

« PreviousChapter ListNext »