Bookstruck

कला म्हणजे काय? 129

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शेजा-यांवर प्रेम करणे, सर्वत्र बंधूभाव राखणे ह्या थोर भावना आज कांही थोडया थोर व्यक्तींच्या हृदयांतच उचंबळत आहेत. ह्या भावना सर्वसाधारण करणे, प्रत्येकाच्या हृदयांत त्या जिवंत ठेवणे, ह्या भावना जन्मजात, जणू उपजतवृत्तीच करून टाकणे हे कलेचे काम आहे. कलेला हे सिध्दीला न्यावयाचे आहे. बंधूभाव व प्रेम यांच्या भावना काल्पनिक चित्रांत रंगवून प्रत्यक्ष जीवनांत त्या त्या परिस्थितीत मनुष्याने अनुभवाव्या हे धर्ममय कला शिकवील. मनुष्याच्या अंतरंगांत असा नवदीप प्रज्वलित करील की त्या प्रकाशांत त्याची पावले पडावी. असा नवपंथ त्याला दाखवील की त्या पंथाने त्याने जावे. कला ही महान गुरु आहे, हा मोठा प्रेमळ व मायाळू गुरु आहे. अंतरंगांत शिरून शिकविणारी ही माता आहे, प्रेमाच्या गोष्टी सांगून शिकविणारी ही मोठी मैत्रीण आहे. विश्वव्यापक, सर्व चराचराला कवटाळणारी ही उद्याची थोर कला माणसामाणसांतील खोटे अभिमान, काल्पनिक भेद दूर करील; अत्यंत विभिन्न अशा लोकांनाही एका भावनेने एकत्र आणील. ही नवकला ऐक्याचे तस्य शिकवील व केवळ कल्पनेत बुध्दीने नव्हे तर प्रत्यक्ष जीवनात विश्वात्मकतेचा अपार व अमृतमय आनंद चाखवील. जीवनाच्या संकुचित मर्यादा ओलांडून जिवाला विश्वाशी एकरूप होण्यातील आनंद अनुभवावयास लावील.

सर्वांनी एकत्र येण्यात, परस्पर बंधुभाव प्रत्यक्ष जीवनात दाखविण्यात आपले सर्वांचेच हितमंगल आहे हा विचार हृदयाहृदयांत कला बिंबवील. बुध्दीचा हा ठेवा हृदयालाही कायमचा देऊन टाकील. आज जे सत्तेचे साम्राज्य आहे, त्याच्याऐवजी देवाचे राज्य पृथ्वीवर आणणे, सत्ता व संपत्ति ही दैवते दूर करून प्रेमदेवतेला प्रस्थापित करणे हे कलेचे थोर ध्येय आहे. हे सर्वंकश प्रेम सर्वव्यापी, निर्मळ व निरपेक्ष प्रेम हे मानवी जीवनाचे परमोच्च गन्तव्य व प्राप्तव्य आहे; हे प्रेम म्हणजे परमोच्च विकास, हे प्रेम म्हणजे अंतिम मोक्ष, हे प्रेम म्हणजेच भूचर स्वर्ग निर्माण करणे, हे प्रेम म्हणजेच सैतान दूर करून सत्यस्वरूप सच्चिदानंदाला आपणांत आणणे; हे शक्य करणे हे कलेचे ध्येय आहे. या ध्येयासाठी कला जगेल, कला मरेल.

काळ अनंत आहे. भविष्यकाळांतील शास्त्रे कदाचित याहूनही थोर व नवीन अशी ध्येये कलेला दाखवितील व कला त्या ध्येयांचाही अनुभव घेईल, तीही जीवनांत प्रगट व्हावीत म्हणून ती धडपडेल. आजच्या ख्रिस्तधर्मीय कलेचे काम आजच्या ख-या धार्मिक कलेचे काम सर्वत्र बंधुभाव, सर्वत्र समता व सर्वत्र निर्मळ प्रेम निर्माण करणे हे आहे.

भाग दुसरा

(टॉलस्टॉयने दुस-या ग्रंथकरांच्या ग्रंथांना कांही प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्या प्रस्तावनातून कलेसंबंधीचे विचार त्याने प्रगट केले आहेत. अशा प्रस्तावनांतील कांही प्रस्तावना मी पुढे देत आहे.)



(व्हॉन पॉलेझच्या Der Buttnerbaner  या कादंबरीला टॉलस्टॉयने लिहिलेली प्रस्तावना. पॉलेझ याने दोन कादंब-यांत खेडयांतील लोकांच्या जीवनाचे, सामान्य लोकांच्या जीवनाचे चित्र रंगविले आहे. दुस-या दोन कादंब-यांत शहरांतील व जमीनदार वर्गातील लोकांची चित्रे रंगविली आहेत. आणि एका कादंबरीत साहित्य मंडळाचे, साहित्यभक्तांचे वर्णन आहे. प्रस्तुतच्या कादंबरीमध्ये सामान्य लोकांचे जीवन ताणलेले आहे.)

« PreviousChapter ListNext »