Bookstruck

कला म्हणजे काय? 143

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

फ्लॉबर्टने जुलियनची एक गोष्ट लिहिली आहे. या सुप्रसिध्द गोष्टीचेटर्जिनॉव्हने भाषांतर केले आहे. त्या गोष्टीतील शेवटचा प्रसंग वाचकांवर फार परिणाम व्हावा म्हणून योजिलेला आहे. जुलियन एका मरपोन्मुख महारोग्याच्या अंथरुणात निजून त्याला स्वत:च्या अंगाची ऊब देतो. त्याला ऊब देण्यासाठी स्वत:च्या पोटाशी घट्ट धरून ठेवतो... असा तो प्रसंग आहे. हा महारोगी म्हणजे परीक्षा पाहणारा ख्रिस्तच असतो. तो ज्युलियनला स्वर्गात घेऊन जातो. हा प्रसंग मोठया बहारीने व कुशलतेने रंगविलेला आहे. परंतु तो प्रसंग वाचीत असताना माझे हृदय थंडच राहिले. ही गोष्ट वाचताना माझे हृदय उंचंबळून आले नाही. कारण तो प्रसंग वाचताना मनात असे येते की ज्युलियनने जे केले ते ग्रंथकाराने काही केले नसते. ग्रंथकाला तसे करण्याची इच्छाही झाली नसती. त्याने केवळ बाह्यचित्र रंगविले आहे. तो ज्युलियन ग्रंथकाराच्या हृदयगाभा-यांतून कांही निघालेला नाही. तो त्याच्या मेंदूतून फार तर निघालेला असेल. ज्युलियनने जे केले ते करण्याची ग्रंथकाराला तळमळ नाही असे मनात येऊन मलाही तसे करावे असे मनांत वाटत नाही. अशा प्रकारे दिव्य प्रेमाची व अद्भूत त्यागाची ही कथा वाचताना कोणतीही प्रबळ भावना उचंबळून येत नाही.

परंतु सेमिनॉव्ह एखादी साधीच गोष्ट लिहितो व ती वाचून माझे हृदय विरघळते. त्याची ती गोष्ट चटका लावते. खेडयांतून कांही उद्योगधंदा मिळावा म्हणून शहरांत आलेल्या त्या तरुणाचीच गोष्ट घ्या ना. मॉस्को शहरांत कांही कामधाम मिळावे म्हणून तो येतो, त्याच्या खेडयाच्या जवळपासचाच एक मनुष्य मॉस्को शहरांतील एका श्रीमंत मनुष्याकडे गाडीवान म्हणून असतो. ह्या मित्राच्या वशिल्याने व सांगण्यावरून त्या श्रीमंताच्या घरी या तरुणाला नोकरी मिळते. अंगण वगैरे झाडणा-या एका नोकराच्या हाताखाली याने काम करावे असे ठरते. पूर्वी हे काम एक म्हातारा मनुष्य करीत होतो. तो अजून त्या कामावर होताच. त्याला काढून टाकून त्याच्या जागी या तरुणाची नेमणूक झाली होती. आपला काय अपराध घडला हे त्या म्हाता-यास समजेना. गाडीवानाने काहीतरी सांगितले व म्हणून त्या श्रीमंताने त्या म्हाता-याला काढून त्या नव्या तरण्याताठया मुलास नेमले. सायंकाळी तो तरुण आपल्या कामावर रुजू होण्यासाठी म्हणून येतो, त्यावेळेस म्हाता-याचे शब्द त्याच्या कानी पडतात. ज्याच्या हाताखाली त्याला काम करावयाचे असते त्याच्या खोलीत तो म्हातारा बसलेला असतो व म्हणतो, ''माझा काडीइतकाही अपराध नाही असे असून मला का हो काढून टाकता? मी म्हातारा झालो हाच का माझा गुन्हा? परंतु काम तर मी अजून नीट करतो ना? त्या नव्या तरुणाला जागा देण्यासाठी म्हणूनच केवळ मला काढले. कामांत हयगय नाही,  कांही चूक नाही, तुम्ही सांगा ना धन्याला.'' असे त्या म्हाता-याचे शब्द दाराशी उभा असलेल्या तरुणाच्या कानी पडले. क्षणभर तो तरुण उभा राहतो, त्याचा कांहीतरी निश्चय होतो, त्याला त्या म्हाता-याची कीव येते, त्या म्हाता-याने आता कोठे जावे? कोठे याला अशी कमी दगदगीची नोकरी मिळेल? हे झाडण्यालोटण्याचे हलके काम आहे, फार श्रमाची नाही. करू दे, या म्हाता-यालाच ते करू दे. मी तरुण आहे, सशक्त आहे. कोठेही पोटाला मिळवीन. त्या म्हाता-याला काढून टाकण्याला आपण कारणीभूत झालो याचे त्याला वाईट वाटते, तो ओशाळतो, लाजतो, जावे की रहावे असे हो ना करता करता तो निश्चय करून तेथून शेवटी निघून जातो. जी नोकरी मिळाल्यामुळे त्याला आनंद झालेला असतो, जी नोकरी फार श्रमाची व दगदगीची नव्हती, जिची त्याला फार जरूरही होती, ती नोकरी सोडून तो निमूटपणे तेथून निघून जातो.

सेमिनॉव्हने हे सारे अशा त-हेने सांगितले आहे की जेव्हा जेव्हा ही गोष्ट मी पुन:पुन्हा वाचतो, तेव्हा तेव्हा मला असे वाटते की ग्रंथकाराला त्या परिस्थितीत स्वत: तसेच करण्याची फार इच्छा आहे. एवढेच नव्हे तर तो खरोखरच तसा वागला असता. त्या ग्रंथकाराच्या भावना माझ्याही हृदयांत जागृत होतात. आपणही तसेच करावे असे मला वाटू लागते. ही गोष्ट वाचून मन प्रसन्न होते. आपणही असेच कांहीतरी चांगले केले पाहिजे, असे वाचकाला वाटू लागते.

« PreviousChapter ListNext »