Bookstruck

कला म्हणजे काय? 148

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


शाळेतील मुले व कला

(टॉलस्टॉयने यास्नाया पॉलियाना येथे एक शाळा काढली होती. या शाळेतील कांही मुलांबरोबर टॉलस्टॉय रात्री एकदा फिरावयास गेला होता. त्यावेळेस एका शेतक-याच्या दहा वर्षांच्या मुलाने कला म्हणजे काय असा त्याला प्रश्न केला. टॉलस्टॉय म्हणतो, त्या रात्री कलेची उपयुक्तता व नैतिक सौंदर्य सारे काही आम्ही बोललो. परंतु त्या रात्रीनंतर पुढे ३७ वर्षे जावयाची होती. सदतीस वर्षानंतर कला म्हणजे काय हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ प्रसिध्द झाला. मनासारखे सर्व विवेचन ह्या ग्रंथांत त्याने मांडले आहे.)

वर्ग संपताच सारी मुले बाहेरच्या अंगणात जमून आरडाओरड करू लागत. एकमेकांना हाका मारून टोळया टोळया करून आपापल्या घरी जात. त्या त्या आळीतील त्या त्या बाजूची मुले बरोबर जमून घरी जात. कधी कधी शाळा सुटल्यावरही जरा खेळ वगैरे खेळत. आपापल्या शिक्षकांबरोबर बोलत, खेळत, रमत. शाळा सुटल्यावरच शिक्षक व विद्यार्थी यांचे अधिक मोकळेपणाचे, अधिक जिव्हाळयाचे, विश्वासाचे असे संबंध जमत असतात. क्रीडांगणावर फिरावयास जातांना असे खुल्या दिलाचे संबंध जडतात. असे आंतरिक संबंध निर्माण करणे हेच शाळेचे खरे ध्येय आहे. संध्याकाळी सहाच्या सुमाराला वर्ग भरत. आठ नऊ वाजता ते सुटत. (कधी कधी सुतारकामातील मोठी मुले जरा उशीरापर्यंत बसत)

कांही दिवसांपूर्वी वरच्या वर्गात गोगोलने लिहिलेली 'बी' ही गोष्ट आम्ही वाचली होती. बी म्हणजे पृथ्वीवरचे एक भूत. ही गोष्ट अंगावर शहारे आणणारी होती. गोष्टीतील शेवटच्या प्रसंगाचा तर मुलांच्या मनावर फारच परिणाम झाला होता. पुढे पुष्कळ दिवस त्या शेवटच्या प्रकरणाचा मुले पुन:पुन्हा उल्लेख करीत असत.
त्या दिवशी चांदणे नव्हते. हिवाळयांतील ती काळोखी रात्र होती. परंतु वरती आकाशांत बरीच अभ्रे आलेली होती, म्हणून थंडी फारशी वाजत नव्हती. जेथून रस्ते फुटतात तेथे आम्ही थांबलो. तिस-या वर्गातील मोठी मुले माझ्याजवळ येऊन उभी राहिली व म्हणाली, ''चला, आमच्याबरोबर आणखी पुढे चला.'' लहान मुलांनी आमच्याकडे पाहून धूम ठोकली. नवीन शिक्षकांबरोबर शिकण्यास नुकताच त्यांनी आरंभ केला होता. जुन्या मुलांत व माझ्यात जेवढा विश्वास होता, तेवढा त्यांच्यात व माझ्यात अजून उत्पन्न झाला नव्हता.

''खरेच आपण जंगलांत जाऊ चला.'' एकजण म्हणाला, (घरांपासून साधारण पाव मैल अंतरावर जंगल होते)

फेडका तर फारच जाऊ जाऊ म्हणत होता. त्याचे वय फार नव्हते. फक्त दहा वर्षांचे होते. त्याचा स्वभाव कोवळा, काव्यमय व साहसी होता. साहस म्हणजे त्याचा आनंद, त्याचा सखा. त्याची ग्रहनशक्ती फार तीव्र होती. उन्हाळयांत तो तळयामध्ये पोहावयास गेला म्हणजे मला भीती वाटत असे. तळयाच्या थेट मध्यापर्यंत तो पोहत जाई. तळयाची रुंदी जवळ जवळ ४०० फूट होती. तो  पाण्यामध्ये बुडून आत पोहे. मध्ये सूर्याच्या स्वच्छ किरणांत वरती येई. पुन्हा पाण्याखाली जाई. पुन्हा वरती येऊन एकदम पाठीवर पाहू लागे. आकाशांत तुषार उडवी. आपल्या उंच आवाजाने तीरावरच्या मुलांना मोठमोठयाने हांका मारी व म्हणे, ''पहा, पहा कसा मी पोहत आहे, पहा कसा मी दिसत आहे.''

« PreviousChapter ListNext »