Bookstruck

मित्रांची जोडी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गुणा मोठा होत होता. गुणाचा एक गुण रामरावांच्या लक्षात आला. गुणाला वाद्यें वाजवण्याचा नाद लागला. त्याचा एक मित्र होता. पंढरीशेटचा लहान मुलगा जगन्नाथ हा गुणाचा मित्र. दोघे एका वर्गात होते. जगन्नाथ व गुणा यांचें एकमेकांवर फार प्रेम. ते जवळ जवळ बसत. बरोबर फिरायला जात. बरोबर नदींत डुंबत. ते एकमेकांस कधीं विसंबत नसत. जगन्नाथाचा गळा फार गोड होता. देवानें त्याला गोड आवाजाची देणगी दिली होती. पंढरीशेटचा हा सर्वांत लहान मुलगा. तो आईबापांचा फार लाडका होता. फार प्रेमानें त्याला वाढवण्यांत आलें. तो दिसेहि सुरेख. त्याच्या चेह-यावर एक प्रकारची कोमलता होती. आणि डोळे जणुं प्रेमसरोवर होते. केस काळे कुळकुळीत होते. आणि कधीं सणावाराचे दिवशीं जेव्हां तो सुंदर पोषाख करी, अलंकार घाली, तेव्हां तर त्याची मूर्ति फारच मनोहर दिसे.

“तुमच्या जगन्नाथला मधुर कंठ आहे. त्याला गाणें शिकवा ना.” एक मित्र पंठरीशेटना म्हणाले.

“गाण्यानें मुलें बिघडतात. उद्यां मोठे झाल्यावर बैठकी करतील. सारे पैसे उधळीत. कशाला हवा गोड आवाज? उद्यां कठोर आवाजाची जरूरी लागेल. कुळें खंड देत नाहींत, पैसे परत करीत नाहींत. त्यांचेवर जरा ओरडतां आलें पाहिजे. रागानें सांगतां आलें पाहिजे. गोड आवाज! काय करायचे ते?” पंढरीशेट म्हणाले.

“असें नका हो म्हणूं. गायनाची कला म्हणजे दैवी कला. सर्व दु:खांचा विसर पाडणारी कला. तुम्हांला अनुकूलता आहे म्हणून सांगितले.” तो मित्र म्हणाला.

पंढरीशेटनीं ऐकलें नाहीं. परंतु पुढें जगन्नाथच वडिलांच्या पाठीस लागला. आणि आईकडूनहि त्यानें वशिला लावला. शेंवटीं एक गवई जगन्नाथास शिकवूं लागला. गोड आवाजाला शिक्षणाची जोड मिळाली. जगन्नाथ सुंदर गाऊं लागला.

आणि हा जगन्नाथ गुणाचा आतां मित्र झाला होता. गुणा जगन्नाथकडे जाई. गाणें ऐके. गवई शिकवीत असतां गुणाहि तेथें बसे. तेथें हळूहळू सारीं संगीतवाद्यें जमूं लागलीं. तबला, तंबोरे आले. पेटी आली. सतार, सारंगी आली. जणुं गांधर्व विद्यालय सुरू झालें.

गुणाला गाता येत नसे. परंतु त्यांचें हृदय संगीतानें वेडें होई. ते स्वर त्याच्या कानांत घुमत. त्याचीं बोटें नाचत. जगन्नाथाच्या खोलींत तो हळूच सतार हातीं घेई. तारा छेडी, पडदे दाबी. आपणांला हें सारें येईल असें त्याला वाटूं लागलें. तंतुवाद्याची त्याला मोहिनी पडली. आपण तंतुवाद्य शिकावें असें त्याला वाटूं लागलें.

« PreviousChapter ListNext »