Bookstruck

मित्रांची जोडी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असे विचार रामरावांच्या मनांत येत होते. शेवटीं त्यांनी गुणाला त्या वर्गीत घातलें. गुणाला आनंद झाला. जगन्नाथानें त्याला सतार-सारंगी दिली. गुणा सुखी झाला. त्याच्या बोटांतील अद्भुत कला प्रकट होऊं लागली. नजीरखां गुणावर खुष झाला. “बेटा, सारे शिष्य सोडून गेले तरी तुला मी शिकवीन. तुझ्यासाठी येथें राहीन.” असें तो म्हणे.

जगन्नाथ व गुणा म्हणजे स्वर्गातून उतरलेली जणुं बालगंधर्वाची जोडी. गांवांत संगीताचे कार्यक्रम झाले तर तेथें जगन्नाथला गाणें म्हणायचा आग्रह करीत. गुणाला वाजवण्याचा आग्रह होई. आणि कधीं कधीं जगन्नाथ गाई व गुणा साथ करी. अपार रंग चढे. त्यांच्या गायनवादनांतून अपूर्व मधुरता प्रकट होई. जणुं मनाची कोमलता, हृदयांतील मैत्री, सरळ स्वभाव प्रकट होई.

शाळा केव्हां सुटेल व केव्हां घरीं जाऊं असें या दोघा मित्रांस होई. गुणा जगन्नाथाकडे जाई. दोघे संगीतसागरांत डुंबत. सायंकाळ केव्हां होई हें दोघांस कळत नसे. त्यांच्या जीवनांतहि संगीत उचंबळत होतें. ते जणुं दोन देहांतील एक मन झाले, दोन देहांतील एक आत्मा बनले, एक हृदय बनले. एकमेकांस एकमेकांशिवाय चैन पडत नसे. उजाडतांच गुणा जगन्नाथाकडे येई. त्याचेजवळ दोन शब्द बोलून घरीं जाई. जगन्नाथ त्याला कढत दूध देई.

“रोज रोज रे कशाला इजाडत येतोस?” एके दिवशीं गुणाला कोणीतरी म्हणालें.

“माझ्या मित्राला भेटायला.” तो म्हणाला.

“दूध मिळतें प्यायला म्हणून येत असशील. घरीं आहे काय? बापानें सारें घालविलें.”

“तरी मुलाला गाणें-वाजवणें शिकवतो आहे. सावकाराचें व्याज मात्र देतां येत नाहीं. सा-या लबाड्या.”

“जा नीघ येथून. जगन्नाथ मळ्यांत गेला आहे.”

अशीं ती बोलणी एकून गुणाला वाईट वाटलें. तो का दुधासाठी येत असे? त्या दुधाची का त्याला तहान होती? तो मित्रप्रेमाचा भुकेला होता. इतर लोकांना उजाडत चहा लागतो. कोणाला दूध लागतें. गुणाला मात्र मित्राचें दर्शन पाहिजे असे. परंतु ते शब्द ऐकून त्याचें हृदय दुखवलें गेलें. गुणा सकाळीं येईनासा झाला.

« PreviousChapter ListNext »