Bookstruck

मित्रांची जोडी 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तुझा गुणा रे कां अलीकडे येत नाहीं? तो येत नाहीं म्हणून का तूं दूध घेत नाहींस?”

“त्या दिवशीं दादा गुणाला बोलला. दूध प्यायला येथें येतोस असें त्याला म्हणाला. म्हणून तो येत नाहीं. आई, दादाने का असें बोलावें? गुणाला स्वभिमान आहे. तो माझ्यासाठीं येत असे. इजाडत मित्राला भेटायला येत असे. परंतु त्या दिवसापासून तो येईनासा झाला आणि मलाहि दूध पिऊं नये असें वाटतें.”

जगन्नाथच्या आईनें गुणाला बोलावणें पाठवलें. तो आला.

“काय आई?”

“बसा दोघे येथें. पोटभर दूध प्या. गुणा, येत जा हो तूं. तूं आला नाहींस तर जगन्नाथ रडतो. तुला कोणी बोललें तरी मनावर घेऊं नकोस. तूं माझ्याकडे पहा व ये. तुझ्या मित्रासाठीं ये हो.” असें आई म्हणाली.

दोघे मित्र दूध पिऊन वर गेले. जगन्नाथ गाऊं लागला व गुणा वाजवूं लागला. रस्त्यांतून येणारे-जाणारे खालीं उभे राहूं लागले. मित्रप्रेमाचें दिव्य संगीत वर स्रवत होतें. परंतु जगन्नाथाचा दादा एकदम तेथें आला.

“पुरे रे तुमचें रडगाणें. कांहीं काळवेळ आहे का नाहीं? तिकडे जमाखर्च जुळत नाहीं. आणि तुमची येथें कटकट. बंद करा आवाज.” दादा गरजला.

“वाजव रे गुणा. दादाचें ऐकूं नकोस.” जगन्नाथ म्हणाला.

“मी फेंकून देईन ती सारंगी.”

“फेंक रे कशी फेंकतोस ती पाहूं? मी प्राण देईन परंतु ती फेंकू देणार नाहीं.”

“जगन्नाथ, पुरेच करूं आपण. मी जातों.”

“गुणा, जाऊं नकोस. तूं वाजव, मीहि गातों. आग लागूं दे त्या जमाखर्चांना. सारंगी म्हणे फेंकीन! मी त्या जमाखर्चाच्या वह्या फेंकीन. अंजनी नदीच्या डोहांत बुडवीन. गोड आवाजाची सारंगी म्हणे नको. आणि शेतक-यांना रडवणा-या त्या वह्या, त्या म्हणे हृदयाशी धराव्या!”

“वह्या बुडवून खाल काय?”

« PreviousChapter ListNext »