Bookstruck

मित्रांची जोडी 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“उसनी नाहीं आणली. हें सारें जगन्नाथाचें आहे. त्यानें गंमत केली. हा रेशमी सदरा त्याचाच व हें धोतरहि त्याचेंच. मी नको नको म्हणत होतो; परंतु तो ऐकेना. म्हणे तू माझा मित्र ना? मग घाल हें सारें, मला ऐट मुळीच नको. उसनी तर नकोच नको.” असें म्हणून गुणा गळ्यांतून काढू लागला.

“गुणा, काढूं नको गळ्यांतून, नाहींतर बघ. मी तुझ्याजवळ कधीं बोलणार नाहीं. ती कंठी माझी आहे. दादाची थोडीच आहे? माझी. वस्तु मीं तुला दिली. तूं माझा म्हणून दिली.”

गुणा काढूं पाहत होता. जगन्नाथ काढूं देईना. शेवटीं दादा संतावला व म्हणाला, “काढूं दे त्याला. ती कंठी घालून तो घरीं जाईल वाटतें! म्हणे मीं त्याला दिली! काठ रे गुणा.”

“गुणा काढूं नको. हें सारें मीं खरोखरच तुला दिलें आहे.”

“अरे दिलें म्हणजे काय? कायमचें का दिलें? म्हणे त्याला दिलें! उद्या एखाद्या भिका-यालाहि देशील अंगावरून काढून. बावळट कुठला!” दादा रागावून बोलला.

“दादा, गुणा भिकारी वाटतें?”

“भिकारी नाही तर काय? भुक्कड तर झाले आहेत.”

“दादा, गुणा माझा मित्र आहे. तो भुक्कड असेल तर मलाहि होऊं दे. मी श्रीमंत असेन तर त्यालाहि होऊं दे. तो माझा मित्र आहे. तो व मी निराळे नाहीं. याची गरिबी ती माझी व माझी श्रीमंती ती त्याची. गुणा हें सारें तुला मीं दिलें आहे. हें माझें आहे.”

“म्हणे माझें आहे! कधीं मिळवून आणलेंस, कोठें तलवार मारलीस?”

“आणि तुम्ही तरी कोठें गेले होतेत मारायला? बाबा तरी कोठें गेले होते? सारा गांव म्हणतो कीं डाक्याची संपत्ति यांच्याकडे आहे म्हणून आणि गरिबांना छळून तुम्हीं आणखी वाढवलीत. गुणा, घे. हें सारें घे. तूं तें काढणार असशील तर मीहि हे फेकींन. माझा मित्र भिकारी, तर मलाहि भिकारी होऊं दे. काय करायची ही श्रीमंती?”

« PreviousChapter ListNext »