Bookstruck

कोजागरी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कोजागरीचा दिवस आला. शरद्ऋतूंतील प्रसन्न दिवस. शेतेंभातें पिकलेलीं असतात. सोन्यासारखें पीक आलेलें असतें. गुरेंढोरें धष्टपुष्ट असतात. भरपूर चारा असतो. नद्यांचें पाणी प्रसन्न असतें. आकाश निर्मळ असतें. अशा वेळेस हा सुंदर दिवस कल्पिलेला आहे. रात्रीं दुधासारखें स्वच्छ चांदणे पडलेंले असतें. जणुं आकाशांतून दुधाच्या अनंत धारा पृथ्वीला स्नान घालीत असतात. आणि पृथ्वीवरहि या वेळेस दुधाची रेलचेल असते. आनंदाचा दिवस. सुखासमाधानाचा दिवस. केलेल्या श्रमाचें फळ पाहून कृतार्थ होण्याचा दिवस. शरद्ऋतूंतच कृष्णाची मुरली वाजे व सा-या जगाला वेड लावी.

जगन्नाथानें सारी तयारी केली होती. बाहेर गच्चींत सुन्दर बैठक घालण्यांत आली होती. दयाराम भारतींसाठीं सुन्दर आसन मांडलेलं होतें. स्वच्छ चांदणे पडलें होतें. गुणा आला. इतर समवयस्क मित्र आले. ते बहुतेक शाळेंतील विद्यार्थीच होते.

आणि दयाराम भारती आले. त्यांना जाग्रण फार सहन होत नसे. त्यांची प्रकृतिहि जरा बरी नव्हती. परंतु ते आले होते. सारे विद्यार्थी वाटोळे बसले. दयाराम म्हणाले, “तरुण मित्रांनो, तुम्ही सारे विद्यार्थी आहांत. शिकत आहांत. मुलगा जेव्हां प्रथम शाळेंत जातो, तेव्हां जर आपण त्याला विचारलें, बाळ शाळेंत कां जातोस? तर त्याला नीट उत्तर देतां येणार नाहीं. परंतु तुम्ही आता बाळ नाहीं. तुम्हांला आतां उत्तर देतां आलें पाहिजे. कां बरें शिकतों आपण? आपण मनुष्य होण्यासाठीं शिकत असतों. मनुष्य होणे म्हणजे काय? विचार करायला शिकणें. स्वत:चा व आजूबाजूच्या जगाचा. असा विचार करूं लागलों म्हणजे जागृति येते. आजूबाजूचे प्रश्न दिसतात. आजूबाजूचे अन्याय दिसतात, दु:खें दिसतात. सेवेची आवड उत्पन्न होते. इतरांना हातभार लावावा असें वाटूं लागतें. तो हातभार लावतां यावा म्हणून शिकावें, म्हणून स्वत:चा विकास करून घ्यावा, म्हणून स्वतांत पात्रता आणावीं अर्पण करायचा असतो.

शिक्षणानें आपण कोणत्या तरी ध्येयाला वाहून घेण्याचें ठरवितों. कोणीहि केवळ स्वत:साठीं जगत नसतो. हें तत्त्व ज्या मानानें जीवनांत येईल, त्या तत्त्वाचा जसजसा जीवनांत साक्षात्कार होत जाईल, त्या मानानें आपलें जीवन सुन्दर होईल, थोर होईल. त्या मानानें आपल्या जीवनाची सफलता होईल.

शिक्षण तुम्हांला जागृत करतें. तुमच्या भावना जागृत करतें. तुमची बुद्धि जागृत करतें. कोजागरीचा हाच अर्थ. कोजागरी म्हणते को जागर्ति? कोण आहे जागा, कोण आहे जागा? जो जागा असेल तो भाग्यवान्. भाग्य जागृताला मिळतें, झोपलेल्याला नाहीं. तुम्ही जागे व्हा. आजूबाजूच्या स्थितीचा विचार करा. आज शेतेंभातें पिकलीं आहेत. कपाशी पांढरी फुलली आहे. ज्वारी डोलत आहे. परंतु शेतक-याला हें राहील का? त्याला त्याच्या श्रमाचें फळ मिळेल का? आज कोजागरी, तुम्ही दूध प्याल; गाणें कराल. परंतु गाईगुरें चारणारे तुमचे गडी, तुमचे गुराखी त्यांना मिळेल का घोट? हा विचार आहे का तुमच्या मनांत? ही जागृति आहे का? तुमची बुद्धि या गोष्टीचा करते का विचार? तुमच्या हृदयांत येतात का ह्या भावना? अद्याप आपण निजलेले आहोंत. आपणांस इतरांचा विचार नाहीं. दुस-यांच्या सुखदु:खाचा विचार नाहीं. श्रमणारे लोक कंगाल झाले त्याची फिकीर नाहीं.

« PreviousChapter ListNext »