Bookstruck

कोजागरी 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“मांडील आतां ठाण माझा कामगार
घेऊन सत्ता दिव्य नव जग निर्मिणार।।धृ.।।

ही ऐतखाऊ मालदारी बांड्गुळें
प्रगती जगाची ज्यांमुळें ही पांगुळे
गाडा जगाचा ज्यांमुळें अड्खळे
ते अड्थळे मार्गांत जे जे मोडणार।।मां.।।

बंदूक अथवा बाँब भिववी ना तया
प्राणांचिही ती अल्प ना पर्वा तया
श्रमजीविसत्ता या जगीं स्थापूनियां
जखडीत जीं जीं बंधनें तीं तोडणार।।मां.।।

श्रमजीविसत्ता स्थापण्या सारे उठा
हातांत घ्या हा लाल उज्ज्वल बावटा
भूतें विरोधी दूर सारीं दामटा
संसार सर्वां मानवांचे शोभणार।।मां.।।

असा शहरांतील कामगार जागा होत आहे. इकडे किसानहि जागा होत आहे. तुम्हीही मरायचें नसेल तर जागे होऊन या. जागृत श्रमीजनशक्तींशी मिळा व पृथ्वीवर आनंदाचा स्वर्ग फुलवा.

कितीतरी वेळ दयाराम भारती बोलत होते. त्यांना जणुं भानच नव्हतें. ते मुलांना अमृत पाजीत होते. त्यांना जागृति देत होते. माणुसकीचें चांदणें त्यांच्या हृदयांत फुलवीत होते. त्यांचें प्रवचन संपलें.

“तुम्ही आणखी थोडा वेळ थांबतां?” गुणानें विचारलें.

“गुणा सारंगी वाजवील.” जगन्नाथ म्हणाला.

“आणि जगन्नाथ गाणें म्हणेल.” गुणानें सांगितलें.

“बसतों मी. आज मला बरें वाटत आहे. आज तुमच्यासमोर मीं माझें हृदय ओतलें. हलकें झालें आतां. जणुं कळा थांबल्या. म्हणा गाणें. वाजवा सारंगी. उद्यां मानवी जीवनांत तुम्ही संगीत आणणार आहांत ना? आज स्वत:च्या जीवनांत भरून घ्या.”

« PreviousChapter ListNext »