Bookstruck

कोजागरी 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“ना सण ना वार.”

“त्यांना सदैव चिंता.”

“त्यांना सदैव वाण.”

“रोज उपासमार.”

“रोज मरण.”

“अरे रे! काय ही दशा.”

असें म्हणत तीं मुलें जात होतीं. जगन्नाथच्या गच्चीवर तीं सारीं आलीं. दूध प्यावेंसें कोणाला वाटत नव्हतें. परंतु प्याले व सारे घरोघर गेले. जागे होऊन झोंपीं गेले. जगन्नाथ व गुणा दूध घेऊन खरोखरच पुन्हां मळ्यांत गेले.

“मला वाटलें तुम्हीं थट्टा केलीत.” सोनजी म्हणाला.

“सोनजी, दु:खाची का थट्टा करूं? घे हो हें दूध. जनीला कढत कढत दे.”

“तुम्ही पुन्हां कशाला आलेत? बाहेर गारवा आहे.”

“प्रेमाची ऊब मिळाली होती. सोनजी, जातों हां.”

“देव तुम्हांला उदंड आयुष्य देवो. गरिबांचे वाली व्हा.”

जगन्नाथ व गुणा परतले. नदीकांठीं ते गेले. स्वच्छ सुंदर नदी गुणगुण करीत वहात होती. अंजनी प्रार्थना म्हणत होती.

“जगन्नाथ, आपंली अंजनी म्हणजे कांहीं मोठी गंगा-यमुना नव्हे. परंतु जगासाठीं वाहून राहिली आहे. असेल जवळ तें देत आहे. उन्हाळ्यांत कांहीं जवळ नाहीं राहिलें तर स्वत:चे हृदय ओतून देते. झरे खणावे आणि नदीचें हृदय न्यावें.”

“गुणा, आपण लहान आहोंत. तरीहि आपणांस कांहीं करतां येईल. गरिबांची थोडी वास्तपुस्त घेतां येईल. नाहीं?”

“जगन्नाथ, मी गरीब, मी काय करूं शकणार?”

« PreviousChapter ListNext »