Bookstruck

आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“ही वही खोटें नाहीं सांगणार. जें आलें असेल तें लिहिलेलें आहे. तुम्ही वेळच्या वेळेस व्याज देत नाहीं. रक्कम फुगत जाते. मग तुम्ही जागे होतां. आतां मुदत चार महिन्यांची राहिली. मुदतीच्या आंत काम आटोपलें पाहिजे. हा व्यवहार आहे. व्यवहार तो व्यवहार.” दिवाणजी म्हणाले.

“काय करूं रावसाहेब, मागच्या वर्षी पीक नीच आलें नाहीं. या वर्षी भाव नाहीं. घरांत पोरगा आज आठ महिने आजारी आहे. नका करूं फिर्याद, नका नेऊं घरदार. कांहीं तडजोड करा. हळूहळू देऊं पैसे.”

“हळूहळू केव्हां द्याल? तें कांहीं नाहीं. आम्हांला आतां सवड नाहीं. न्यायाला दयामाया नाहीं.”

“नका दादा असें करूं. तुम्हीच आमचे मायबाप. तुम्ही धनी. सांभाळून घ्या. घरांत बायको बाळंतीण. सध्यां खायला दाणेहि नाहींत हो घरांत. काय सांगावें तुम्हांला!”

“खायला नाहीं घरांत मग पोरांचे पाळणे कशाला?”

“तें का आपल्या हातचें आहे दादा?”

“तूं जा आतां. नीघ. फाल्तु बोलायला वेळ नाहीं. उगीच कटकट. पै द्यायला नको. उठा, निघा.”

वरून जगन्नाथ एकदम खालीं आला. त्याच्यानें राहवेना. जो शेतकरी शेतें पिकवतो, त्याच्या मुलांना का दाणे नसावे? पोरें कशाला, असें आम्हीं बांडगुळांनीं त्यांना कां विचारावें व हिणवावें?

“अहो त्यांना असें काय बोलतां? तीं माणसें आहेत.” जगन्नाथ संतापून म्हणाला.

“कसलीं माणसें? डुकरें बरीं. कर्जबाजारी, घरीं खायला नाहीं. तरी डुकरांसारखीं पोरें पैदा करतात.” दिवाणजी बोलले.

डुकरें तुम्ही आम्ही आहोंत. कांहीं श्रम न करतां खाणारे व पोरें निर्मिणारे. शेतकरी घाम गाळतो. त्यालाच पोरें निर्माण करण्याचा अधिकार आहे. तो धान्य निर्माण करतो. वाटेल तें बोलतां. तुम्हांला लाज नाहीं वाटत?” जगन्नाथ जणुं जमदग्नि झाला.

« PreviousChapter ListNext »