Bookstruck

आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“अरे आहे काय हा तमाशा? तूं अलीकडे त्याच्यावर कां सूड धरला आहेस? त्याला मारतोस काय? तुम्ही वेगळे तरी व्हा सारें. पाडा हिस्से.” आई म्हणालीं.

“आई, याला काडीची अक्कल नाहीं. यानें वर तबला बडवावा, आ आ करावें. व्यवहार कळेल तर शपथ. सर्वांना हा भिकेला लावील.”

“तुम्हींच सर्वांना भिकेला लावलें आहे. शेंकडों शेतक-यांना भिकेस लावलें आहे.”

“तूं आम्हांला लाव.”

“लावीनच.”

“पुरे रे. आम्ही दोघं अजून जिवंत आहोंत तों तुम्ही मारामारी करता. आम्ही गेल्यावर काय कराल?” आई म्हणाली.

“जगन्नाथ, जा तूं वर.” पंढरीशेट म्हणाले.

जगन्नाथ वर गेला. तो फारच खिन्न होता. आपल्या खओलींत पडून राहिला. आज मधल्या वेळीं तो खायलाहि खालीं गेला नाहीं आईला राहवलें नाहीं. ती त्याच्या खोलींत आली. त्याच्याजवळ बसली. त्याच्या केसांवरून हात फिरवीत होती.

“चल खालीं. थोडें खा.” ती म्हणाली.

“मला नको खायला. मीं फक्त दोनदां जेवायचें ठरवलें आहे. इतर कांहीं नको. मला गरीब होऊं दे. हळूहळू गरिबांसारखें राहायला लागूं दे.”

“वेडा आहेस. तुझें आतां लग्न झालें म्हणजे तुम्ही सारे वेगळे व्हा. आम्ही तुझ्याजवळ राहूं. भांडण नको, तंटा नको. हो. चल. ऊठ, माझें ऐक. अलीकडे नीट खात नाहीत, पीत नाहींस. अशानें रे कसें होईल? ऊठ.”

“आई, मला लग्न नाहीं हो करायचें.”

“कांहींतरीच. लग्न कधींचें ठरलेलें आहे. त्यांना का फसवायचें? आमच्या तोंडाला का काळें फांसणार? कांहींतरी जगाच्या विपरीत तुझें बोलणें. चांगला संसार कर. आम्ही आहोंत तों एकदां नीट तुझा संसार सुरू झालेला पाहिलां म्हणजे झालें. मग डोळे मिटले तरी हरकत नाहीं. बरें, तें जाऊं दे. येतोस ना खायला?”

“गुणा आला म्हणजे आम्ही खाऊं.”

“केव्हां येणार आहे गुणा?”

“येईलच तो. तूं आम्हांला वरच दे लाडू पाठवून.”



« PreviousChapter ListNext »