Bookstruck

आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“आई, आमच्या कसल्या चालल्या होत्या गोष्टी?”

“गाण्या वाजवण्याच्या. होय ना?”

“हो. परंतु कोठें करायचें गाणें वाजवणें?”

“कोठें म्हणजे?”

“आम्ही रस्त्यांतून भिकारी होऊन गाणीं गात हिंडणार आहोंत. गुणा सारंगी वाजवील, मी गाणीं गाईन. आणि एके दिवशीं पुन्हा तुझ्या दारांत येऊं. तूं भिक्षा घालशील. एखादा सदरा मागूं, पांघरायला द्या कांहीं आई, असें दीनवाणें म्हणूं. तुला येईल का दया? आई, तूं ओळखशील का ग एकदम मला? आणि तूं बाहेर भिक्षा घालायला आलीस व मीं जर एकदम तुझे पाय धरले तर तूं घाबरशील, ओरडशील. मी मग हळूच म्हणेन ‘आई’, आणि तूं मला हृदयाशीं धरशील, अश्रूंचें स्नान घालशील. मजा होईल. नाहीं आई? अशा हो आमच्या संगीत गोष्टी चालल्या होत्या.

“जगन्नाथ, तूं का वेडा होणार? काय वेड्यावेड्यासारखें बोलतोस? त्या दयाराम भारतींने तुम्हांला बिघडवलें. त्यांच्याकडे जात जाऊं नका. श्रीमंतांच्या मुलांना चो भिकारी करील.”

“परंतु शेतक-यांच्या मुलांना पोटभर खायला देईल. आई, ते दयाराम भारती म्हणजे थोर अवलिया आहेत. त्यांना नको नांवें ठेवूंस. तू त्या इतर शेंकडों महाराजांच्या पायां पडतेस, पैसे देतेस, त्यांच्या पूजा करतेस. परंतु ते सारे महाराज पै किंमतीचे. नुसते शेणगोळे. काडीचा त्यांचा उपयोग नाहीं. त्यापेक्षां हे दयाराम किती थोर!”

“जगन्नाथ, अशीं साधुसंतांना नांवें नको ठेवूं बाळ. अशानें भलें नाहीं हो होत.”

“ख-या साधुसंतांना कोण ठेवील नांवें? खरा साधु तो, जो रंजल्या गांजलेल्यास जवळ करतो. अन्यायाच्या विरुद्ध उभा राहतो. हे तर अन्यायाला आशीर्वाद देतात. लुटारू श्रीमंतांना धन्यवाद देतात.”

“असेंच कांहींतरी बोलत असशील व मग दादा संतापत असेल, मारायला धांवत असेल.”

“खरें बोलायला कोणाची भीति?”

“गुणा, तुझ्या मित्राला कांहीं शिकव तरी थोडें. आज दादाच्या अंगावर यानें हात टाकला हो. हें बरें का?”

« PreviousChapter ListNext »