Bookstruck

जगन्नाथचे लग्न 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“त्याच्या दादानेहि संमति दिली?”

“पंढरीशेटनी त्याला तू काही बोलू नकोस असे सांगितले. त्यामुळे तो चुरमुरे खात बसला.”

“गुणा, तुला आसले मिंधेपण आवडते? उपाशी रहावे परंतु सत्त्व सांभाळावे. बाळ, अशाने काही आपली मान वर होता नाही. लोक नावे ठेवतात.”

“परंतु जगन्नाथ ऐकत नाही. त्याचे का मन दुखावूं? त्याला रडायला लावूं?”

“आणि आम्हाला का खाली मान घालायला लावणार?”

“आई, मी काय करूं?”

“जगन्नाथाचे तुझ्यावर खरेच प्रेम आहे का?” रामरावांनी विचारले.

“हे.”

“कशावरून?”

“तो माझ्यासाठी रडतो यावरून. माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो यावरून. त्याला जराही दुजेपणा सहन होत नाही. दोघांनी एकरूप व्हावे असे त्याला वाटते. अशा प्रेमाला कसे दुखवू बाबा?”

“गुणा, आपल्या या वाड्याची पुढेमागे जप्ती होणार. लिलाव होणार आहे. जगन्नाथचाच दादा आणील जप्ती. तुझा मित्र त्या वेळेस काय करील?”

“येथे येऊन प्राण देईल; परंतु जप्ती होऊ देणार नाही.”

“तुला असे वाटते?”

“असे अभिवचन आणूं? जगन्नाथजवळून शब्द आणूं?”

“पोरांच्या शब्दाला काय किंमत?”

“ज्याचे आतां लग्न होणार, तो काही पोर नाही राहणार. लग्न झाल्यावर त्याच्या शब्दासहि किंमत येईल. लग्नामुळे घरांतील त्याचा दर्जा एकदम वाढेल. तो इतर भावांच्या बरोबरीचा होईल. जगन्नाथ आपणांला वाचवील. तो असला अभद्र प्रकार होऊ देणार नाही. बाबा, माझ्यावर खरेच हो त्याचे प्रेम आहे. जे मला देता येणार नाही, ते त्याला नकोसे वाटते. परंतु तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी हे सारे परत करतो. तो व मी आपापल्या घरी रडत बसू. करू सारे परत? ही आंगठी, हे कपडे?”

« PreviousChapter ListNext »