Bookstruck

जगन्नाथचे लग्न 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“चल, मी त्यांना सांगतो की अशी गोष्ट मी होऊ देणार नाही. चल.”

आणि खरेच दोघे मित्र खीला गेले. रामराव पूजेला बसले होते. देवाजवळ होते. दोघे मित्र देवासमोर उभे होते.

“गुणाचे बाबा!” जगन्नाथने हाक मारली.

“काय रे?” त्यांनी विचारले.

“तुम्ही देवाजवळ आहात. मीहि देवासमोर उभा राहून सांगतो की तुमच्या घराचा लिलाव मी होऊ देणार नाही. तुम्ही निश्चिंत असा.”

“देव तुझे कल्याण करो! तुम्हां दोघांचे प्रेम अमर होवो! दीच देवाला माझी प्रार्थना.”

दोघे मित्र गेले. जगन्नाथ घरी गेला. त्याला पोचवून गुणा घरी आला.

जगन्नाथचे लग्न जवळ आले. तिथि जवळ आली. मोटारी तयार झाल्या. नवरदेवाची मोटार सजली. जगन्नाथजवळ त्याचा गुणाहि बसला. त्याच्या बहिणीहि त्या मोटारीत होत्या. दोघे मित्र पुढे बसले होते. हातांत हात घेऊन बसले होते. जगन्नाथ दागिने घालायला बिलकूल तयार नव्हता. हा रानटीपणा आहे, तो म्हणाला. परंतु शेवटी त्याचे काही चालले नाही. त्याच्या आईने त्याला सजविले.

“आजच्या वेळेस घाल. पुन्हा तुला कधी सांगणार नाही. तुझ्या अंगावर पुन्हा दागिना घालणार नाही.” आई म्हणाली.

“मग त्याच्या मुलांच्या अंगावर घाला.” कोणी तरी हसून म्हणाले.

जगन्नाथ आईसमोर उभा राहिला. तिने त्याच्या गळ्यांत गोफ, कंठी घातली. हातांत तोडे घातले. कमरेला सोन्याचा करगोटा धोतरावरून घालण्यांत आला. कानांत सुंदर कुडक्या घातल्या गेल्या. जगन्नाथ म्हणजे तुळशीबागेतील जणु राम, बालाजी मंदिरांतील जणुं बालाजी दिसू लागला.

« PreviousChapter ListNext »