Bookstruck

येथें नको, दूर जाऊं 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रामराव गेले. त्यांनी तयारी चालविली होती. काही थोडे पैसे त्यांनी भांडीकुंडी विकून गोळा केले होते. आंवराआंवरी चालविली. मध्यरात्रीनंतर एक बैलगाडी हळूच येणार होती. निमूटपणे ते जाणार होते.

गुणा जगन्नाथच्या घरी गेला. जगन्नाथ खोलीत होता.

“जगन्नाथ भूक लागली आहे. काही खायला दे.”

“काय देऊ? लाडू आणूं? तू आपण होऊन आज मागितलेस. कधी मागायचा नाहीस. काय आणू?”

“अशी वस्तु आण की जी मला कायमची पुरेल.”

“असे काय आहे?”

“तुझे प्रेम.”

“ते तर मी कधीच तुला दिले आहे. त्या दिवशी रात्री मी उभा होतो. खिडकीतून शांत चंद्र डोकावत होता. वाटे, तूं समोर येऊन उभा आहेस. तुझा आत्मा आला आहे भेटायला. गुणा, तुझ्या प्रेमासाठी काय करूं? तुझ्या प्रेमासाठी मी भिकारी होईन. घरदार सोडीन. वेळ आली तर हे प्राणहि देईन.”

“जगन्नाथ, आज मी सारंगी वाजवतो.”

“वाजव. बरेच दिवसांत तू तारा छेडल्या नाहीस.”

“आणि तूंहि गा.”

“नको. आज गाणे नको. आज फक्त तू वाजव.”

आणि गुणाने सारंगी घेतली. किती अप्रतिम वाजवली त्याने! दोघे मित्र डोळे मिटून बसले होते. मध्येच जगन्नाथ गुणाच्या मुखमंडलाकडे पाही. मध्येच गुणा डोळे उघडी व जगन्नाथ भावनांनी रंगलेला मुखचंद्र बघे. सारंगी थांबवी. दोघा मित्रांनी एकमेकांना मिठी मारली. गुणा रडू लागला. तो भावनांनी कांपत होता. सारंगी थांबली. परंतु हृदयसारंगी थरथरत होती. मुके संगीत तींतून बाहेर पडत होते.

“गुणा! गुणा!”

“जगन्नाथ!”

“काय रे झाले गुणा?”

“आज पूर्वीच्या सर्व स्मृति उसळल्या, उचंबळल्या. तू मला दागिन्यांनी नटवलें होतेस, तो दसरा आठवला. मी आलो नाही म्हणून तू दूध पीत नसस. मी कधी आलो तर तू स्वत:ची गादी मला द्यावय़ाचास व स्वत: दुसरे काही घेऊन झोपावयाचास! किती तुझे प्रेम! आणि मी तुला काय दिले? तुझ्या प्रेमावर मी पोसलेला आहे. ते प्रेम मला पुढेहि पोशील.”

« PreviousChapter ListNext »