Bookstruck

गुणा कोठें गेला गुणा? 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रात्री जगन्नाथला नीट झोप आली नाही. कितीदा तरी त्याच्या मनात आले की गुणाकडे जावे. त्याच्याजवळ बसून आज पोटभर गावे. परंतु आता कोठे जायचे रात्री? तो खिडकीजवळ उभा राही. त्या एका रात्री चंद्र त्या खिडकीतून डोकावत होता. आज अंधार होता. आकाशातील तारे थरथरत होते. माझा गुणा का रडत आहे? हे का त्याचे अश्रु? त्याने खिडकीतून हात पुढे केले. जणु गुणाचे अश्रु पुसण्यासाठी. परंतु ते अश्रु दूर होते. अनंत आकाशात होते. त्याला हसू आले. आणि खरोखरच गुणाचे अश्रु आता दूर होते, दूर जात होते. ते पुसायला त्याचे हात पोचते ना.

पहाटे पहाटे त्याला झोप लागली. किती तरी उशिराने तो उठला. अजून उठला का नाही म्हणून आई पहायलाहि आली. परंतु शांत झोपला आहे असे पाहून त्याच्या अंगावरचे पांघरूण सरसावून व खिडकी बंद करून प्रमळ माता गेली.

जगन्नाथ उठला. त्याने खिडकी उघडली. प्रकाशाचा झोत आला. जणुं मित्रप्रेमाचा प्रकाश आला. गुणा येऊन गेला असेल असे त्याला वाटले. ही खिडकी उघडी होती. गुणा बंद करून गेला वाटते! मला न उठवता गेला! हळूच आला हळूच गेला. कोमळ, प्रेमळ गुणा.

तो खाली गेला. त्याने प्रातर्विधि केले.

“आई, गुणा का आला होता?”

“कधी? नाही रे?”

“मग वर खिडकी कोणी लाविली? मी निजतांना तर उघडी होती. कोणी लावली? मला वाटले गुणा येऊन गेला.”

“मी आल्ये होत्ये हो. तुला आपला जेथे तेथे गुणा दिसतो. आमचेहि थोडे प्रेम आहे हो तुझ्यावर. आई येऊन गेली असेल, पांघरुण घालून गेली असेल, असे रे का नाही तुझ्या मनात आले? आमची का नाही तुला आठवण येत?”

“तुम्ही घरांतच आहात. गुणा जरा दूर तिकडे राहातो. माणूस दूर असते तयाची आठवण येते.”

« PreviousChapter ListNext »