Bookstruck

आगगाडींत भेटलेला देव 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कलकत्त्याकडे आहे एक तशी संस्था, आणि अहमदाबादलाहि निघणार होती; परंतु आधी मॅट्रिक व्हावे लागते, कॉलेजमधलेहि काही शिक्षण घ्यावे लागते असे वाटते. पाहू पुढे, जसे जमेल तसे.”

“या तर खरे, हा घ्या माझा पत्ता, या पत्त्यावर पत्र टाका; स्टेशनवर मी येईन. सारे नीट होईल.”

“तुम्ही जणुं देवच भेटलांत. कोणाला हिमालयांत भेटतो, कोणाला पंढरपूरला भेटतो, आम्हांला आगगाडीत भेटला. आम्ही निराश होतो, निराधार होतो; तुम्ही एकदम आशा दिलीत. देवाघरचा वसंतवारा येतो व सुकलेली झाडे फुलतात; त्याप्रमाणे तुम्ही आलेत. आशा देणारा, दया दाखवणारा, प्रेम देणारा तोच देव, असे दयाराम भारती म्हणायचे.” गुणा म्हणाला.

“हे दयाराम भारती कोण?”

“तुम्ही नाही ऐकलेत नांव त्यांचे? ते कोठले कोण आम्हांलाहि माहीत नाही; परंतु ते खानदेशांत काम करीत, शेतक-यांत हिंडत, त्यांची संघटना करीत. पेटवीत खेडोपाडी. उठवीत पडलेल्या शेतक-यांस. सरकारने त्यांना हद्दपार केले आहे, खानदेशात यायला बंदी केली आहे. ते कोठे गेले असतील कोणास माहीत? त्यांनीच गरिबांचे दु:ख पाहण्याचे डोळे आम्हांला हिले. आमच्या जीवनांत त्यांनी क्रांति केली, त्यांनी आम्हांस माणसे बनवले, आमच्यांत ध्येयवादाची ज्योत त्यांनी पेटविली. कधी न विझणारी ज्योत—अमर, निर्मळ ज्योत! त्यांनीच आम्हांला नवीन यथार्थ मूल्यमापन शिकविले कशाचे महत्त्व ते शिकविले; एक प्रकारची नवदृष्टी त्यांनी दिली. कसे ते बोलत, कसे ते वागत! किती साधे! पाला खाऊनहि रहावयाचे, परंतु साधे, शांत दिसले तरी त्यांच्या मनात अंगार पेटत होता; गरिबांबद्दलच्या चिंतेची चिता पेटलेली होती; दयाराम भारती! किती सुंदर व गोड नाव! ते भारताचे होते, स्वत:ला त्यांनी पुसून टाकले होते. भारतासाठी ते जगत होते व भारतासाठी जगण्यातच त्यांचे खरे जीवन होते. किती त्यांचे वर्णन करू? त्याचे शब्द कानांत आहेत, त्यांची काळीसावळी मूर्ति—धगधगीत वैराग्याची मूर्ति, गरिबांसाठी तडफडणारी, धडपडणारी. अन्याय बघून ज्वालायमान होणारी, ती करुण उग्र मूर्ति, सौम्य, स्निग्ध, रुद्र मूर्ति—माझ्या मनांत आहे. जीवनाचे संगीत त्यांनी आम्हांला शिकविले. गरिबांची हाय हाय दूर करूनतुटलेल्या तारा जोडा. संगीत निर्मा; असे ते आम्हा तरुणांस म्हणावयाचे. दयारामांचे अनंत उपकार!”

ते सदगृहस्थ ऐकत होते.

“तुमची सारंगी गोड व तुमची वाणीहि गोड. जणुं दयाराम भारतीच माझ्यासमोर आहेत असे मला वाटले. या तुम्ही इंदूरला. काय असेल ते असो. मला तुमच्याविषयी काही तरी वाटते. माझ्या जीवनातील अज्ञात तार जणुं छेडतील. एक नवीन दालन जणुं उघडलेत. मला सांगता येत नाही. या, तुम्ही खरेच या. इंदूरला या.”

« PreviousChapter ListNext »