Bookstruck

दु:खी जगन्नाथ 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“होय आई, मला कोठे तरी जाऊ दे. इंदिरा माहेरीच राहू दे. हिंदुस्थानची यात्रा करून मला येऊ दे. मग तिला आणू हो आई!”

“अरे यात्रा करायची का ही वेळ? म्हातारपणी यात्रा कराव्या. संसार करायची ही वेळ.”

“आई, यात्रा केल्यानंतर संसारयात्रेस लागावे. म्हणजे संसारच परमार्थमय होईल. मग इतर यात्रांना म्हातारपणी जाण्याची जरूरीच उरणार नाही. तारुण्य आहे, शक्ती आहे, तोच पराक्रम करावा, यात्रा कराव्या, पुण्य मिळवावे. तारुण्यांतच वैराग्य शोभते. म्हातारपणच्या वौराग्याला काय किंमत आई?”

“तुझ्याजवळ नाही हो मला बोलता येत. आम्ही जुनी माणसे; वेडी, अडाणी.”

“मग जाऊ ना उद्या धुळयास?”

“जा. परंतु परत ये.”

“येईन हो परत. मी कोठे दूर जायला निघालो तर तुम्हाला सांगून जाईन; न सांगता जाणार नाही.”

“तुझ्या गुणाचा काही पत्ता कळला का?”

“मला तो रोज भेटतो.”

“थट्टा कर.”

“आई, थट्टा नाही. मी गुणाच्या घरी जातो. त्याच्या खेलीत बसतो. तेथे गुणाचा फोटो आहे. त्या फोटोजवळ मी बोलतो. गुणा हसतो.”

“सांग ना रे, कळले का काही?”

“नाही हो काही कळले!”

“कुठे रे गली असतील?”

“मी तरी काय सांगू आई?”

असे म्हणून जगन्नाथ उठून गेला. गुणाविषयी कोणी त्याला प्रश्न विचारू लागले म्हणजे तो अस्वस्थ होई. आपल्या मित्राची माहिती आपणांसहि नसावी याची त्याला जणु लाज वाटे. तो जणु स्वत:च्या मैत्रीचा त्याला अपमान वाटे.

« PreviousChapter ListNext »