Bookstruck

इंदूर 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“बरें.”

गुणा कपडे तसेच ठेवून आला. इंदूने रामाला साबण लावून कपडे स्वच्छ धुवायला सांगितले.

जेवायची तयारी झाली. सारी जेवायला बसली.

“मी मागून बसेन.” गुणाची आई म्हणाली.

“बसा आताच. भुकेल्या असाल.” इंदूची आई म्हणाली. शेवटी आढेवेढे न घेता गुणाची आईहि इंदूजवळ जेवायला बसली. बोलत जेवणे होत होती.

“गाडीत गर्दी होती का?” रामरावांना मनोहरपंतांनी विचारले.

“फार गर्दी. काही लग्नाची मंडळी होती. मारवाडी लग्ने.”

“परंतु यांनी सारंगी वाजविली असेल व गर्दी हटली असेल.”

“इतकी गर्दी होती की सारंगी फुटायची वेळ आली होती.”

“हे काय इंदु, तुझे झाले?” मनोहरपंतांनी विचारले.

“मला शाळा आहे बाबा. तुमचे काय?” ती म्हणाली.

“यांनाही उद्यांपासून शाळा.” मनोहरपंत म्हणाले.

“परंतु ते मुलांच्या शाळेत जातील. माझ्या शाळेत थोडेच येणार आहेत? जाते हं आई मी.” असे म्हणून इंदु गेली.

जेवणे वगैरे झाली. दिवाणखान्यांत रामराव, गुणा, मनोहरपंत बसले होते. रामरावांनी विडा वगैरे खाल्ला. गुणाने लवंग घेतली. तो दिवाणखाना बघत होता. दिवाणखान्यांत सुंदर तसबिरी होत्या. सृष्टिसौंदर्याचे देखावे होते. संगीताची साधनेहि होती. तबला, बाजाची पेटी एका बाजूस दिसत होती. एका कपाटांत ग्रंथसंग्रह दिसत होता.

तुम्ही आता दोघे पडा जरा. रात्रीचे जागरण आहे तुम्हांला. रामाने आंथरुणे घालून ठेवली आहेत वरती तिस-या मजल्यावर. तेथे शांत आहे. झोप येईल.” मनोहरपंत म्हणाले.

दोघे झोपले. स्वच्छ आंथरुणे होती. पांघरायला स्वच्छ खादीची शाल होती. खाली गुणाची आईहि अंग टाकती झाली. विचार करीत करीत गुणा झोपी गेला.

« PreviousChapter ListNext »