Bookstruck

इंदूर 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“खरेच. परंतु टेबल पाठवीनच. त्या टेबलावर फुलदान ठेवावे. मी संजि-याचा एक ताजमहाल आणून देईन. तो येथे ठेवू.”

“आणि तुम्हांला नको?”

“दोन आहेत माझ्या टेबलावर. दोन काय करायचे? एक तुमच्या टेबलावर होईल. तुमचे टेबल छान दिसले पाहिजे. छान दिसली पाहिजे खोली. कोणी आले तर त्याला प्रसन्न वाटले पाहिजे. येथे बसावे असे वाटले पाहिजे.”

“येथे कोण येणार आहे माझ्याकडे? ना कोणी ओळखीचे, ना मैत्राचे.”

“मी येईन. मी आहे ना आतां ओळखीची? मला नको चांगली दिसायला खोली.”

“हवी दिसायला.”

“चला आता कुलूप लावून. आई मला म्हणाली की त्यांना घेऊन ये येतांना.”

“चला.”

रामराव, गुणा व गुणाची आई इंदूबरोबर निघाली. परंतु गुणा कोठे आहे!

“हे काय, गुणा कोठे आहे?” रामरावांनी विचारले.

“ते पहा पुढे चालले. त्यांना वाटले की घर अद्याप पुढेच आहे.” असे म्हणून इंदु धावली.

“अहो घर मागे राहिले. कोठे चाललांत? आता चुकले असतेत. भलत्याच घरांत गेले असतेत.”

“चुकलो असतो तर परत आलो असोत. तुझ्या घरी परत आलो असतो. मी चुकणार नाही असे वाटत होते. एकदा पाहिले की मी सहसा चुकत नाही.”

“एरंडोलांत नसाल चुकत. परंतु इंदूर काही एरंडोल नाही.”

“इंदूर म्हणजे काही पुणे मुंबई नाही.”

“इंदुरांत चुकलात तर पुणे, मुंबई, कलकत्त्यांत तुमचे कसे होईल?”

“तुम्ही आलांत चुकलेल्यास घ्यायला तसे कोणी येईल.”

“काय रे गुणा, पुढे गेलास वातचे?” रामराव हसत म्हणाले.

“मी पुढे जाणारा आहे. दयाराम भारती म्हणत पुढे चला. आगे कदम उठावो.”

« PreviousChapter ListNext »